रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचार, सुविधांयुक्त खाटा असणे बंधनकारक- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख


            औरंगाबा द:रुग्णालयांनी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवणे हे नियमानुसार बंधनकारक आहे, त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयामध्ये पर्याप्त प्रमाणात अत्यावश्यक उपचार सुविधायुक्त खाटा ठेवाव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात आयोजित आढावा बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, मनपा उपायुक्त श्री. नेमाडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी उपचार सुविधांचे बळकटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णालयात पर्याप्त प्रमाणात खाटा उपलब्ध असण्यावर भर देण्यात येत असून रुग्णांना तातडीने अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्ध होणे हे कोवीड संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यकतेप्रमाणे खाटांची उपलब्धता ठेवत असताना त्या अत्यावश्यक उपचार सुविधेसह असल्या पाहिजे यावर कटाक्षाने लक्ष द्यावे, असे सांगून श्री देशमुख यांनी आरोग्य विभागाने कायम स्वरुपी उपलब्ध खाटांची संख्या याबाबतची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून तयार ठेवावी. जेणेकरुन कोविड व त्यानंतरच्या काळातही ते उपयोगाचे ठरेल, असे सांगितले. तसेच रुग्ण मृत्यू पावणार नाही यासाठीची विशेष खबरदारी घेण्याबाबत निर्देशित करुन श्री. देशमुख यांनी प्राधान्याने कोरोनातून बरे झालेल्यांना पुढील जीवनशैली कशी असावी, काय करावे , काय करु नये, यासह घ्यावयाच्या खबरदारीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कोरोनातुन बरे झाल्यानंतर निश्चितच काही काळ अनेक शारिरीक हालचाली करतांना विशेषत्वाने काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्यांनी दैनंदिन जीवनशैली सुरु करतांना खबरदारी घेत काम करणे उपयुक्त ठरेल, याबाबत मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन, वैद्यकीय सल्ला देण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यावा. यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’  मोहिमेद्वारे याबाबतचे मार्गदर्शन लोकांच्या घरोघरी जाऊन करावे, अशा सूचना श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.
             तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठी प्राधान्याने ऑक्सीजन पुरवठा करण्याचे धोरण शासनाने अवलंबलेले असून येत्या काळात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजनसाठा  तसेच आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावर भर द्यावा,  असे सूचित करुन श्री. देशमुख यांनी जिल्ह्यात सुरु करण्यात येणाऱ्या महिला, बाल रुग्णालयासाठीच्या पदभरतीबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यासोबतच घाटीतील रिक्त पदांच्या भरतीबाबतही मंत्रीमंडळ बैठकीत पाठपुरावा  केला जाईल, असे सांगितले. 
            यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच उपचार सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 90 टक्क्यांपर्यत पोहचत आहे.  मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येत असून  या उपक्रमातंर्गत जनतेमध्ये जाणीव जागृती करीता विविध ठिकाणी होंर्डिग्ज  लावण्यात आले आहे. त्याद्वारा जनतेत मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे इत्यादी बाबीची जनजागृती केली जात आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असून समाजात कोरोनाविषयीची भीती दूर करुन कोरोनातून लवकर बरे होण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी ‘मन मे है  विश्वास’  उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आल्याचे सांगून  श्री. चव्हाण यांनी कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या  उपचार सुविधा, औषधीसाठा, प्रतिसाद कक्ष, गृहविलगीकरण  व इतर उपाययोजनांबाबत तपशीलवार माहिती दिली. तसेच कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी शासनमान्य दराप्रमाणे उपचार करणे बंधनकारक असून नियमबाह्य जादा देयक आकारणाऱ्या रुग्णालयांना नोटीसा बजावण्यात आल्या असून काही रुग्णालयांनी अतिरीक्त पैसे परत केल्याचे सांगितले. डॉ. येळीकर यांनी घाटीचे  व्यवस्थापन आणि उपचार सुविधांसाठीच्या प्रलंबित बाबी तातडीने पुर्ण करणे गरजेचे असून त्यादृष्टिने निधी उपलब्ध्ाय होणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.
 
*****

Post a comment

0 Comments