विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा द्यावी- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, 10 वी 12 वी पुरवणी परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण व ड्रोन कॅमेऱ्याचा वापर.


औरंगाबाद, दि.12 गुरुवारी :  जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत 10 वी 12 वी च्या पुरवणी परीक्षा होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे या परीक्षा द्याव्यात. जेणेकरून कॉपी करण्याच्या अपप्रकारात अडकुन होणारे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना टाळता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 10 वी व 12 वी च्या पुरवणी परीक्षांसंदर्भात माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त मीना मकवाना, डॉ. बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उपस्थित होते.
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इ. 12 वी) दि. 20 नोव्हेंबर – 2020 ते दि. 10 डिसेंबर – 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. इयत्ता 12 वी साठी जिल्ह्यामध्ये एकुण 15 केंद्रावर 2795 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी 8 परिक्षक केंद्र (कस्टोडियन) स्थापन करण्यात आले आहे.
तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इ. 10 वी) दि. 20 नोव्हेंबर – 2020 ते दि. 05 डिसेंबर – 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. इयत्ता 10 वी साठी जिल्ह्यामध्ये एकुण 15 केंद्रावर विद्यार्थी – 2402 परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी 8 परिक्षक केंद्र (कस्टोडियन) स्थापन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी  10 वी 12 वी च्या या परीक्षेचे चित्रीकरण व ड्रोन कॅमेराचा वापर राज्यात पहिल्यांदाच या परीक्षांदरम्यान केला जाणार आहे. कोवीड पार्श्वभूमिवर पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी करणे टाळावे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांशिवाय इतरांनी प्रवेश केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असून परीक्षा केंद्राच्या 100 यार्ड परीसरात पोलीस अधिनियम 37 (1) (3) तसेच कलम 144 लागू असल्याचे सांगितले.
विभागीय मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), असे भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे पथके कार्यरत ठेवण्यात येईल. 
पर्यवेक्षक हे 50 टक्के शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागाचे तसेच 50 टक्के शिक्षण विभागाचे ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार केंद्रावर बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले असून परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थी, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असून केंद्रसंचालकांनी केंद्रांवर हँडवॉश/स्प्रे बाटली ठेवावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्रावर स्कॅनिंग करणे आवश्यक असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक नेमण्यात येणार आहे. परीक्षेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून सर्व परिरक्षक, केंद्रसंचालक, सह केंद्रसंचालक पर्यवेक्षक यांना उपरोक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.
******

Post a comment

0 Comments