पुण्यातील 3 वर्षांची बाल खगोलप्रेमी राध्यनीने रचला जागतिक विक्रम.

पुणे, दि. २२ रविवार : वयाचे अवघी तीन वर्षे आणि सहा महिने पूर्ण करणाऱ्या राध्यनी राहुल देवतळे या चिमुरडीने सुर्यमाले विषयीच्या ज्ञानाच्या जोरावर जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. सुर्यमालेशी निगडित 45 प्रश्‍नांची उत्तरे फक्त तीन मिनिटे पन्नास सेकंदात देत तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव प्रस्थापित केले आहे. इतक्‍या कमी वयात असे रेकॉर्ड करणारी ती पहिली भारतीय मुलगी ठरली आहे. नांदेड सिटीचे रहिवासी असलेल्या राहुल आणि नीलम यांची ही कन्या समजायला लागल्यापासून चंद्र, सुर्यासह रात्रीच्या तारकांकडे कुतूहलाने पाहत असते. तिच्या याबद्दलच्या अनेक प्रश्‍नांनी या दाम्पत्याचीही बौद्धिक कसरत होते. परंतु, तिच्या शंकांचे निरसन अगदी तिच्या भाषेत करण्याचा चंगच यांनी बांधला आहे. नीलम सांगतात,"दोन वर्षांची असताना ती चंद्राकडे पाहून नमस्कार करायची. मला वाटले प्रत्येक मुलाला चंद्राबद्दल आकर्षण असते. त्याच भावनेतून ही करत असेल. पण, जेंव्हा मुंबईला नेहरू प्लॅनेटोरीअममध्ये मी तिला घेऊन गेले त्यानंतर तिच्या प्रश्‍नांचा आणि विचारांचा आवाका वाढतच गेला. तिच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देताना आमची दमछाक होते.'' राध्यनी सध्या नांदेड सिटीच्या पवार पब्लिक स्कुलच्या नर्सरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहे. तिच्या या रेकॉर्डबद्दल अभिमान असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.अंजली गुर्जर सांगतात. राध्यनीच्या तल्लख बुद्धिमत्तेला बौद्धिक खाद्य पुरविण्यात कमी पडायचे नाही, असा निर्धारच या दाम्पत्याने केला आहे.विशेष म्हणजे निव्वळ घोकंपट्टी न करता, ते तिच्या बालबुद्धीला पटेल अशा भाषेत सूर्यमालेतील ग्रह, त्यांचा क्रम, वस्तुमान, रंग आदी गोष्टी समजावून सांगत आहे. आवश्‍यक तेथे व्हिडीओंचा आधारही ते घेतात. सध्या तिचे मानवी उत्क्रांतीबद्दल कुतूहल जागृत झाल्याचे नीलम सांगतात. तसेच तिला पुढील खगोल विज्ञान शिकविण्यासाठी आणि संकल्पनांचा विकास करण्यासाठी तिच्या शाळा उघडण्याची वाट ते पाहत आहे. कारण राध्यनीने अजून शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. 
 
''मुलांमधील योग्य गुण ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन द्यायला हवे. त्याच्या बुद्धीला पटेल अशा भाषेत त्यांच्या शंकांचे निरसन करायला हवे. असे मार्गदर्शन लाभल्यास प्रत्येक मुलगा यशाच्या शिखराकडे जाऊ शकतो.''

Post a comment

0 Comments