नगरमध्ये रिक्षात आढळले 57 लाखांचे सोने.नगर, दि.२० शुक्रवार  : शहरामध्ये संशयास्पद फिरणाऱ्या रिक्षाची पोलिसांनी झडती घेतली असता यामध्ये 56 लाख 89 हजार 690 रूपये किंमतीचे 1 किलो 368 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. पोलिसांनी ते सोने जप्त केले असून रिक्षा चालक फैरोज रफीक पठाण (रा. बाबा बंगाली, नगर) याला अटक केली आहे.

कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, ही सोन्याची बॅग पठाण याला गंजबाजार परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पठाण विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे पथक बाबा बंगाली परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद रिक्षा दिसून आली. या रिक्षा चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा चालकाला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने फैरोज पठाण असे सांगितले. रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये 1 किलो 368 ग्रॅम सोने असलेली बॅग मिळून आली. या सोन्या विषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना ठोस पुरावे दिले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी गोरख काळे, योगेश भिंगारदिवे, शाहिद शेख, रियाज इनामदार, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, भारत इंगळे यांनी ही कारवाई केली. रिक्षामध्ये आढळून आलेले सोने ओमप्रकाश वर्मा यांचे असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.

न्यायालयातून हे सोने वर्मा यांना देण्यात येईल. वर्मा यांचे गंजबाजारामध्ये सोन्याचे दुकान आहे. त्यांनी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांना देण्यासाठी हे सोने बॅगमध्ये भरले. ही सोन्याची बॅग दुकानाच्या बाहेर विसरून राहिली. यानंतर रिक्षा चालक फैरोज पठाण याने या बॅगची चोरी केली. यामुळे पठाण विरोधात चोरीचे वाढीव कलम लावले आहे. असे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी म्हटले आहे.

Post a comment

0 Comments