मोदी सरकारची नोटबंदीची मोहीम फसली , काळा पैसा आणि बनावट नोटांचे देशासमोर मोठे आव्हान.

देशातील काळा पैसा आणि  बनावट नोटा संपवण्याच्या इराद्याने मोदी सरकारने नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेतला खरा परंतु काळा पैसा  तर मिळालाच नाही पण बनावट नोटांचे मोठे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चलनातील एक हजार आणि ५०० च्या नोटा बाद करून दोन हजार ५०० , ५० आणि २०  रुपयांच्या नवीन नोटा तयार केल्यानंतर बनावट नोटा तयार करता येणार नाहीत , असा दावाही केला जात होता. पण, राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, बनावट नोटा तयार करणे व त्यांचे चलनात येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गेल्यावर्षीच्या तुलनेत बनावट नोटा बाळगणे, तयार करण्याच्या गुन्ह्य़ांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. 

२०१९-२० मध्ये हे प्रमाण ३७ टक्के झाले आहे.भारतीय अर्थव्यवस्थेला बनावट नोटांचा मोठा फटका  बसत असून याचा फायदा अनेक दहशतवादी  संघटनांना होत आहे. मुळात दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी चलन बदलल्यास बनावट नोट तयार करणे, अवघड जाईल, असा दावा करून केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र या पार्श्वभूमीवर सरकारने आधी कुठलीही पूर्वतयारी न केल्यामुळे देशातील हजारो नागरिकांना नोटा बदलाच्या परिणामांना सामोरे जावे लागले . तर अनेक सर्वसामान्य नागरिकांनी एटीएम व बँकांसमोरच्या रांगेत  उभे राहून आपले जीव गमवावे लागले. या काळात केंद्र सरकारने नवीन नोटा चलनात आणत असताना त्यात किती महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले व त्या किती सुरक्षित आहेत, हे पटवून दिले होते.


लोकांनीही सरकारच्या भूमिकेवर विश्वास ठेवला. पण, नवीन नोटा चलनात येताच काही दिवसांनीच त्यांच्यासारख्याच बनावट नोटा बाजारात येऊ लागल्या. आता तर बनावट नोटा तयार करण्याचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.एनसीआरबीच्या अहवालानुसार २०१९ मध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विविध सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवायांमधून बनावट नोटांची निर्मिती, त्या बाळगण्यासंबंधी दाखल गुन्ह्य़ांमध्ये ११.७ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे  निदर्शनास आले आहे. 

वर्षभरात २ लाख ८७ हजार ४०४ रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या तर  २०१८ मध्ये १७ कोटी ९५ लाख ३६ हजार ९९२ रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हा आकडा सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईंमधून समोर आला असला तरी प्रत्यक्षात बाजारात हजारो कोटी रुपये बनावट नोटांद्वारे चलनात असू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे सर्वाधिक बनावट नोटा दोन हजारांच्या असल्याचे निदर्शनास आले आहे . 

Post a comment

0 Comments