एकरकमी एफआरपीसह २०० रुपये वाढ द्या : राजू शेट्टी.


कोल्हापूर, दि.३ मंगळवार : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसास पहिली उचल विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी. तोडणी वाहतूकदारांना १४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, ही गृहीत धरून शेतकऱ्यांना एकूण एफआरपीच्या १४ टक्के प्रमाणे होणारी २०० रुपये वाढ हंगाम संपल्यानंतर तातडीने देण्यात यावी. अन्यथा, साखर वाहतूक रोखून पैसे वसूल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तर एकरकमी एफआरपी जाहीर करणाऱ्या कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्यास हरकत नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद सोमवारी (ता.२) उदगाव (ता.शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डन येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही ऑनलाइन परिषद झाली. 
 राजू शेट्टी म्हणाले, ‘‘प्रत्येक जण हक्कासाठी भांडतो, पण शेतकऱ्यांना कोणी विचारत नाही, राज्य सरकार पट्टी बांधून बसते, ऊस तोडणी वाहतूकदारांना वाढ मिळाली, पण शेतकऱ्यांना मिळाली नाही. ही रक्कम एफआरपीतूनच वजा होणार आहे. ज्या पद्धतीने त्यांना १४ टक्के वाढ केली. ती शेतकऱ्यांनाही वाढवा, अशी आमची मागणी आहे. उत्पादन खर्च आमचाही वाढला आहे. मग आमच्यावर अन्याय का? हा आमचा सवाल आहे.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत ३५ रूपये करावी. तसेच केंद्र सरकारकडून थकीत निर्यात अनुदानाचे ६ हजार ३०० कोटी रूपये त्वरित कारखान्यांना द्यावे. २०२० -२१ या वर्षकरिता साखरेचे निर्यात अनुदान प्रतिक्विंटल १५०० रूपये करून ७५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी.’’
‘‘ज्या साखर कारखान्यांनी अद्याप २०१९-२० सालची एफआरपी दिलेली नाही, त्या साखर कारखान्याच्या संचालकांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात टाकावे. तसेच राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी साखरेवरील कर्जस्वरूपातील उचल ९० टक्के देण्यात यावी,’’ अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली. राजू शेट्टी यांनी यावेळी एफआरपी साखरेची किंमत व केंद्राचे धोरण याचा सविस्तर आढावा घेतला.

Post a comment

0 Comments