बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचार्‍यावरही हल्ला.

बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचार्‍यावरही हल्ला.
अमरावती, नाशिकसह 15 विशेष पथके नियुक्त; 7 पिंजरे, ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, 125 कर्मचारी तैनात.

आष्टी : आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत मागील चार दिवसांपासून चांगलीच वाढली आहे. दि.24 नोव्हेंबर रोजी सुरुडी येथे नागनाथ गर्जे व किन्ही येथे स्वराज भापकर यांच्यावर प्राण घातक हल्ला करून ठार केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वन विभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. 

सुदैवाने यात गुंजाळ यांना कुठलीही दुखापत झाली नसून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, अमरावतीसह 15 विषेश पथके, 7 पिंजरे, ड्रोन कॅमेरे 2, ट्रॅप 10 कॅमेरे आणि 125 कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यात दोघांचा जीव घेतल्यानंतर नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद, पुणे, सिन्नर, नाशिक येथील विशेष पथके बोलवण्यात आले आहेत. 

बीड जिल्ह्यातील, परळी, धारूर, पाटोदा येथील वनविभागाच्या पथकाला बोलावण्यात आले आहे. हे पथके किन्ही व सुरुडी परिसरात सक्रिय असून अमरावतीचे पथक राज्यातील सर्वात उत्कृष्ट पथक असून या पथकाने आतापर्यंत अनेक हिंस्त्र प्राण्यांना पकडले आहे. तर 7 पिंजरे आणले असून 1 बीड सांगवी येथील महादेव दरा परिसरात लावण्यात आला आहे. 

बाकीचे आवश्यकता पडेल तेथे लावण्यात येणार आहेत. दोन ड्रोन कॅमेरे, दहा ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.वनविभागाचे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्वोत्वपरी प्रयत्न सुरु आहेत. वन विभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र यात गुंजाळ यांना कसलीही दुखापत झाली नाही. त्यांनी हल्ल्यातून स्वत:ला वाचवले.

पिंपरगगव्हण शिवारामध्ये दिसले पायांचे ठसे : बीड : नरभक्षक बिबट्याने दोन जणांचा बळी घेतल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरगव्हण शिवारामध्ये काही दिवसांपासून बिबट्याबाबत चर्चा होत असून एका शेतकर्‍याच्या शेतात पायाचे ठसे आढळून आल्यानंतर शेतकर्‍यांनी याची माहिती वन विभागाला दिली आहे. हे पायाचे ठसे बिबट्याचे आहेत की तडसाचे याबाबत चर्चा होत आहे. एकूणच बिबट्याच्या भीतीपोटी शेतकरी शेतामध्ये जाण्यास टाळू लागले आहे.

पालकमंत्र्यांनी गर्जे, भापकर कुटुंबाचे स्वीकारले पालकत्व : सुरुडी येथील शेतकरी नागनाथ गर्जे व स्वराज भापकर यांच्या कुटुंबियांचे पालकत्व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व ग्रामस्थांसमोर स्विकारले. स्वराज भापकर याच्या कुटुंबालासुद्धा शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा धनादेश व दहा लाखांची एफडीची मदत देण्यात येईल, असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, रामकृष्ण बांगर, सतिश शिंदे, आदि उपस्थित होते.

नागरिकांनी काळजी घ्यावी :
बिबट्या जेरबंद होईपर्यंत नागरिकांनी अफवा न पसरवता वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराच्या बाहेर शक्यतो जाणे टाळा, जाणे आवश्यक असल्यास गळ्यात मफलर किंवा जाड टॉवेल चादर असे काहीतरी गुंडाळा, सोबत दांडा किंवा काठी काहीतरी हातात असू द्या, त्याचबरोबर एकापेक्षा जास्त लोकांनी मिळून जावे. सोबत मोबाईल व इतर उपकरणे मोठ्या आवाजात स्पीकर ऑन करून गाणे किंवा काहीतरी संगीत लावा जेणेकरून जवळपास तो असेल तर त्या आवाजाच्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही.
शाम सिरसाठ, (वन अधिकारी, आष्टी)

बीड, बेदरवाडीत गायीसह शेळीचा पाडला फडशा : जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने एक मुलगा आणि एका व्यक्तीचा फडशा पाडल्यानंतर जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली आहे. पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी शिवारामध्ये शुक्रवारी पहाटे गोठ्यात बांधलेली गाय आणि शेळी यांचाही फडशा बिबट्याने पाडला असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी सकाळी गावकर्‍यांनी ही माहिती वनविभागाच्या कर्मचार्‍यांना दिलेली आहे.

आ.सुरेश धस घटनास्थळी ठाण मांडून : 
किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलगा मृत्यूमुखी पडल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आ. सुरेश धस यांनी पुणे, औरंगाबाद व अमरावती येथुन आलेल्या 125 जवानांच्या विषेश प्रशिक्षित पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तसेच गावकर्‍यांना धीर दिला आहे. त्यांनी पथकातील सर्वांच्या जेवणाची सोय केली. बिबट्याच्या दहशतीने धास्तावलेल्या गावकर्‍यांना आधार देण्याच्या हेतूने आ. धस घटनास्थळी ठाण मांडून आहेत.
बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचार्‍यावरही हल्ला.
अमरावती, नाशिकसह 15 विशेष पथके नियुक्त; 7 पिंजरे, ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, 125 कर्मचारी तैनात.

Post a comment

0 Comments