खडसेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे; अन्यथा पुण्यात कार्यक्रम होऊ देणार नाही! ब्राम्हण महासंघाचा इशारा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राम्हण समाजासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेतले नाही तर पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला आहे.  
तसेच पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केले होते. 
एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रीपदाचे दान दिले, असे खडसे यांनी म्हटले होते. यानंतर ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला होता. दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे, याचे आश्चर्य वाटते. 

खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल, असे आनंद दवे म्हणाले. यासंदर्भात आज ब्राम्हण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आमदारांना निवेदनही देण्यात येणार आहे. 

त्यामुळे आता एकनाथ खडसे आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. 

“मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असे समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेले हे पद मी ब्राम्हणाला दान म्हणून दिले”, असे खडसे म्हणाले होते. 
गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले, असेही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली होती. ‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खे आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिले. 
माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असे म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता.

Post a comment

0 Comments