तापमानाचा होणार नाही त्रास, देशाच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचणार लस

नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनावरील लस विकसित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. कोरोनावरील लसीबाबत सकारात्मक माहिती येऊ लागल्यानंतर आता केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाला कोरोनावरील लस देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. कोरोनावरील लसीची साठवण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोल्ड चेन स्टोरेजसह प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीवर सध्या पंतप्रधान कार्यालय थेट लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोनावरील लसीची निर्मिती करत असलेल्या तीन मुख्य संस्थांना भेट दिली. तसेच कोरोनाच्या लसीच्या वाहतुकीसाठी सरकार लक्झेम्बर्गमधील एका कंपनीसोबत करार करण्याचा विचार करत आहे. ही कंपनी आपल्या तज्ज्ञांची टीम भारता पाठवणार आहे.
हिंदुस्थान टाइम्समधील एका रिपोर्टनुसार लक्झेम्बर्गच्या पंतप्रधानांनी व्हॅक्सिन ट्रान्सपोर्टेशन प्लँट विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गांभीर्याने विचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या पहिल्या शिखर संमेलनावेळी लक्झेम्बर्गच्या पंतप्रधानांनी १९ नोव्हेंबररोजी हा प्रस्ताव दिला होता. या दिशेने चांगली वाटचाल होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रस्तावानुसार गुजरातमध्ये रेफ्रिजरेटेड व्हॅक्सिन ट्रान्सपोर्टेशन प्लँट लावण्यात येणार आहे. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात गावोगावी लस पोहोचवणे निश्चित करण्याच्यादृष्टीने मदत मिळणार आहे.

Post a comment

0 Comments