उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला.

गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला.

पंढरपूर - कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी काही निर्बंध पुन्हा लागू केल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको असेही ते म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, 'गेल्या नऊ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळले,' असे अजित पवारांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, 'अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला खंबीरपणे तोंड देत आहोत. पण मागील काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र असतानाच गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे आवश्यक आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,' असे अजित पवारांनी यावेळी म्हणाले.

तुम्ही कधी आषाढीची पूजा करणार?
आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, तुम्ही कधी आषाढीची पूजा करणार? असे विचारले असता पांडुरंगाने जे दिले आहे त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे अशा शब्दांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदावरच समाधानी असल्याचे सांगितले.

Post a comment

0 Comments