भाजप मेळाव्यातील गर्दीवर मनपा आयुक्‍त नाराज. निवडणूक अधिकार्‍यांकडून योग्य दखल घेण्याची अपेक्षा.

भाजप मेळाव्यातील गर्दीवर मनपा आयुक्‍त नाराज.
निवडणूक अधिकार्‍यांकडून योग्य दखल घेण्याची अपेक्षा.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी दि.23 निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात बुथ कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. या गर्दीवर महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दि.24 प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. 

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अशी गर्दी योग्य नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच आचारसंहिता कक्ष याची योग्य ती दखल घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.
पदवीधर निवडणुकीसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. याच दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. 
त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बुथ कार्यकर्ता मेळावा पार पडला. 

या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात व्यासपीठावर देखील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची गर्दी होती. 

नाट्य मंदिरातील खुर्च्या शिल्लक न राहिल्यामुळे नाट्य मंदिराच्या व्हरांड्यात स्क्रिन देखील लावले होते. तेथेही खुर्च्या टाकलेल्या होत्या. व्हरांड्यातही कार्यकर्ते दाटीवाटीने उभे होते. या गर्दीबाबत पालिका आयुक्‍त पांडेय यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर तीव्र नाराजी जाहीर केली. 

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा धोका आहे. त्यामुळे अशी गर्दी करणे योग्य नाही, असे भाष्य त्यांनी या गर्दीवर केले.

बिहार निवडणुकीत गर्दीचे 150 गुन्हे दाखल : बिहारच्या निवडणूकीत प्रचार सभा, बैठकांमधून अशीच गर्दी होत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने तेथे सुमारे 150 गुन्हे दाखल केले आहे. 

तापडिया नाट्य मंदिरातील भाजप मेळाव्यात झालेल्या गर्दीची देखील निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी आणि आचारसंहिता कक्ष योग्य ती दखल घेतील, अशी अपेक्षा आयुक्‍तांनी यावेळी व्यक्‍त केली.

Post a comment

0 Comments