निवडणूक प्रक्रियेत आचार संहिता पालनाबाबत यंत्रणांनी सतर्क रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.


औरंगाबाद, दि. 12 गुरूवार :   पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात दि. 2 नोव्हेंबर पासून आचार संहिता लागू झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व यंत्रणांनी आचार संहीतेचे काटेकोर पालन करण्याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आचारसंहिता पालना बाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, यांच्यासह पोलीस, महसूल, सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, निवडणूक कार्यक्रम हा विहित कालावधीत यशस्वीपणे पार पाडत असताना सर्व कामांची कालमर्यादा पाळणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठीच्या विविध परवानग्या प्रशासनाकडून निर्गमित करण्यात येणारे विविध परवाने हे योग्य प्रक्रियेव्दारा वेळेत उपलब्ध करून देण्याकरीता सर्वांनी तत्पर राहावे.
तसेच उमेदवारांना वेळेत सर्व परवाने सहजतेने उपलब्ध करुन देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना असून त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात आली असून या ठिकाणी उमेदवारांनी विविध परवाने, प्रचार परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर नियमानुसार निकषाची पूर्तता केलेल्या अर्जदारांना परवानगी देण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया तत्परतेने होण्याच्या दृष्टीने महसूल, पोलीस प्रशासन, निवडणूक निर्णय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांनी समन्वयपूर्वक काम करुन परवाने वितरण करावे. हे करत असताना प्राधान्याने आचारसंहीतेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व संबंधितांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.
पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी पोलीस प्रशासनाची भूमिका निवडणूक प्रक्रियेत खुप महत्वपूर्ण असल्याचे सांगूण कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांकडून नियमानुसार कार्यवाही करुन घेण्याबाबत पोलिसांनी आग्रही रहावे. ज्यांच्यावर गेल्या दोन निवडणूकांमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यांच्याबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करावी. पूर्व इतिहास असलेल्या संभाव्य अडचणी निर्माण करणाऱ्यांवर नियंत्रणात्मक कारवाई करावी. तसेच फरारी, गुन्हेगारांची यादी अद्यावत ठेवावी. दारुच्या अवैध वाहतूक, साठेवाजीवर छापे टाकणे, जप्तीची कारवाई तसेच वाहनांची कडक तपासणी पोलीसांनी करावी, असे निर्देशित करुन पोलीस आयुक्तांनी मतदान, मतमोजणीच्या वेळी कडक सुरक्षा व्यवस्था, प्रचार सभा, आवश्यक ठिकाणांवर पोलीस पथक गस्त व इतर सर्व सुरक्षा उपाय योजना सज्ज ठेवण्याबाबत यावेळी सूचित केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गव्हाणे यांनी आचारसंहिता पालनाबाबतच्या नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये विविध परवाने, परवानग्या या विहीत वेळेत देण्यासाठी पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयपूर्वक काम करणे गरजेचे  असल्याचे सांगून श्री. गव्हाणे यांनी प्रचार कार्यालय तात्पुरत्या  स्वरुपात सुरु करणे, वाहन परवाना, यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी परवानगी देतील तर होर्डीग्ज ,बॅनर, पोस्टर लावणे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था परवानगी देतील. ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत त्याचप्रमाणे सभेची, रोड शो, प्रचार फेरी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येईल. कोवीडच्या पार्श्वभूमीवर वाहन रॅलीत  पाच-पाच वाहनानंतर अंतर ठेवून रॅली  काढणे बंधनकारक  आहे. सर्व प्रक्रियेत सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायजर वापरणे बंधनकारक असून आचारसंहीता नियमांचे प्रभावी पालन करण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी आणि नियमावली समजून घेत काम करण्याच्या सूचना श्री. गव्हाणे यांनी यावेळी दिल्या.

Post a comment

0 Comments