वडवाळीत सरपंचावर अविश्‍वास ठराव दाखल.

सरपंच गणेश गायकवाड हे ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता अरेरावी करतात, असा आरोप करण्यात आला.

पैठण - तालुक्यातील श्रीक्षेत्र वडवाळी ग्राम पंचायतीचे लोकनियुक्त सरपंचावर सोमवारी ग्राम पंचायतीच्या उप सरपंचासह आठ सदस्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. 

ठरावावर निर्णय घेण्यासाठी दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती निवडणूक विभागातील जनार्दन दराडे यांनी दिली आहे.

सरपंच गणेश गायकवाड हे ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता अरेरावी करतात. शासकीय कर्मचारी व अधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिलांना खोट्या केसेस करण्याची धमकी देतात असे आरोप करण्यात आला आहे. 

यावेळी ग्राम पंचायत सदस्य भरत आसाराम पाचे, चंद्रभान पुंजाजी घोडके, प्रभाकर रखमाजी पाचे, हरिभाऊ यमाजी मैंदड, उपसरपंच पुष्पाबाई पांडुरंग जाधव, सुमनबाई पांडुरंग पाचे, रुपाली कडुबाळ खोपडे, मुक्ताबाई रामनाथ घोंगडे आदींनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे अविश्वास ठराव दुपारी दाखल केला. यावेळी बळीराम जाधव, भिमराव गायकवाड, अरुण काळे, बाबासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.

ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची थेट जनतेतून सार्वत्रिक निवडणूक दि.26 फेब्रुवारी 2018 रोजी झाली होती. तेव्हापासून राजकीयदृट्या तालुक्यात संवेदनशील असलेले हे गाव सरपंच गणेश गायकवाड यांच्या मनमानी कारभारामुळे धगधगत होते. 

निलंबित ग्रामसेविकाला हाताशी धरून सरपंच गायकवाड यांनी ग्रामस्थांवर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या वाढत्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वादग्रस्त,चर्चेच्या ठरल्या होत्या. 

संपूर्ण गावाला लोकनियुक्त पदाच्या माध्यमातून वेठीस धरण्याचा, आडवणूक करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच गणेश गायकवाड यांच्यावर सर्वपक्षीय तसेच ग्रामस्थांमधून रोष वाढतच चालला होता. यातूनच पैठण तालुक्यातील हा पहिलाच तडकाफडकी अविश्वास ठराव आणला गेल्याचे बोलले जात आहे.

Post a comment

0 Comments