स्थिर सरकार देण्यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीची बोलणी झाली होती? नवाब मलिकांनी केला खुलासा

मुंबई – लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावर लिहिलेल्या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती, स्थिर सरकार देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देणार होती, मात्र शरद पवारांनी मन बदललं आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी पार पडला, या संपूर्ण घडामोडीवर हे पुस्तक लिहिल्यानंतर खरचं राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपासोबत बोलणी केली होती का? अशी चर्चा सुरु झाली.
परंतु राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप केला आहे, नवाब मलिक म्हणाले की, हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे, ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केले आहे, ज्यापद्धतीने भाजपाने ८० तासाचं सरकार बनवलं, त्यावरुन भाजपाची प्रतिमा मलिन झाली, यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.

Post a comment

0 Comments