कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाभ.


नांदेड : जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्यासाठी प्रयत्नशीन असून त्यासाठी जिल्हा परिषदेत पेन्शन कक्षाची स्वतंत्र स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीने 11 नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या दिलेल्या निवेदनावर त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. 

संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद नांदेड येथील सर्व संवर्गातील कर्मचा-यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्यात यावा. जिल्हा परिषदेतील नवीन ईमारत आराखडयात सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना नवीन शासकीय निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यात यावीत. 
रिक्त वाहन चालकांची पदभरती करण्यात यावी, वाहन चालक वर्गात कनिष्ठ सहाय्यक पदावर संवर्ग बदलुन देण्यात यावा, वाहन चालक यांची सन 2018-19 ची जेष्ठता यादी देण्यात यावी. 
परिचर पदातून वाहन चालक पदावर पदोन्नती देण्यात यावी. वाहन चालकांना आदर्श वाहन चालक पुरस्कार देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील वाहन चालकांचा प्रवास भत्ता देयके अदा करण्यात यावे. 
बाहय संस्थे अंतर्गत घेण्यात आलेल्या कंत्राटी वाहन चालकांना समान काम समान वेतनानूसार मानधन देण्यात यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष गणेश अंबेकर यांनी दिले आहे. 
यावेळी संजय ढेंगळे, किरण वैद्य, ताजोद्दीन वहाबोद्दीन, गंगारेड्डी भंडरवाड, अतिश कांबळे, चंद्रकांत घोडजकर, गजानन पावडे, अमजद खान, कासिम भाई, आनंदा सोळंके आदींची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments