अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना काढला चिमटा.

आमदार-कार्यकर्ते सोबत राहावे म्हणून 'सरकार पडणार'चे गाजर दाखवावे लागते.

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना काढला चिमटा.

कराड - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या 'सरकार पडणार आहे' या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे. 

'सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावेच लागते. कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी आणि आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, यासाठी सारखे गाजर दाखवायचे काम करायचे असते.' असा म्हणून त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कराडमध्ये प्रीतीसंगमावर गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, 'चंद्रकांत पाटलांना कुणी सांगितले आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडली? आम्ही स्वप्ने पाहण्याचे काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसे आहोत. 

विरोधी पक्षांना सरकार पडणार आहे हे सतत म्हणावेच लागते. १९९५ ते ९९ च्या काळात आम्ही ८० जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेसोबत राहण्यासाठी आणि आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, यासाठी सारखे गाजर दाखवायचे काम करायचे असते. 

आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झाले की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत. ते मजबुतीने उभे राहिल, तोपर्यंत सरकारला धक्कासुद्धा लागणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. 

त्यांचे १०५ आमदार असताना देखील त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचे खरे दुखणे आहे. त्यामुळेच सारखे काही ना काही काड्या पेटवायचे काम सुरू आहे.'

Post a comment

0 Comments