अकोल्यात बैठकीस अमोल मिटकरी गैरहजर; राजकीय तर्कवितर्कांना उधाण.

बैठकीचे कोणतेही निमंत्रण नसल्याने गैरहजर, पक्षश्रेष्ठींना कळवली नाराजी : अमोल मिटकरी.

परभणी :  राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकासआघाडी अंतर्गत एकत्रितपणे मैदानात आहेत. त्यामुळे आघाडीची ताकद वाढल्याचे बोलले जाते. मात्र, आता या तिन्ही पक्षांमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे.
अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित आघाडीच्या बैठकीत सर्व आमदार उपस्थित असताना केवळ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच गैरहजर होते. यावर विचारले असता, त्यांनी संबंधित बैठकीचे निमंत्रणच नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. 
महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. अमरावती विभागातून महाविकास आघाडीकडून श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी (21 नोव्हेंबर) अकोल्यात आले होते. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते. 
पण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी गैरहजर होते. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत परभणीत आलेल्या अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले, “अकोल्याच्या बैठकीचे मला कोणतेही निमंत्रण नसल्याने मी बैठकीला उपस्थित नव्हतो. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे, असा होत नाही.” याबाबत मी माझी नाराजी श्रीकांत देशपांडे आणि पक्षश्रेष्ठींना कळवली असल्याचेही अमोल मिटकरी यांनी नमूद केले. “जिथे जिथे महाविकास आघाडीकडून उमेदवार दिले आहेत तिथे तिथे मी आहे. 
अमरावती विभागातही मी आहे, आज मी मुद्दाम मराठवाड्यात आलो आहे. सतीश चव्हाण आमचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ माझा तिसरा दिवस दौरा आहे. तसेच पुण्यातून लाड यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठीदेखील मी जाणार आहे. त्यामुळे मी फक्त येथे आलो, तिथे तिथे गेलो असे नाही. 
मला माझा पक्ष आदेश देईल तिथे मी जाईल आणि ते माझे कर्तव्य आहे,” असे मत अमोल मिटकरी यांनी परभणीत व्यक्त केले.

Post a comment

0 Comments