औरंगाबादची विठाबाई लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांच्या गर्दीत थेट झारखंडला. सहा महिने क्वॉरंटाइन सेंटरमध्ये मुक्काम,आता परतणार गावी.

औरंगाबाद  : लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांची आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू होती. कुठून कशी तरी ६० वर्षीय भोळसर विठाबाईही रेल्वेत मजुरांसोबत बसली अन् थेट झारखंडमध्ये उतरली. 
सहा महिने झाले तरी विठाबाई झारखंडमधील क्वॉरंटाइन सेंटर सोडायला तयार होईना. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीच विठाबाईंची माहिती काढली तेव्हा ती महाराष्ट्रातील औरंगाबादची असल्याचे लक्षात आले. त्यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व ओळख पटवली. 

विठाबाई बाबूराव कुंभफळे (६०) ही महिला औरंगाबाद तालुक्यातील करमाडशेजारी असलेल्या कोळघर गावाची रहिवासी आहे. 
विठाबाईचे पती आणि मुलगा शेतमजुरी करतात. विठाबाई भोळसर असल्याने ती गावाच्या अवतीभवती फिरायची. मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांसाठीची श्रमिक रेल्वे औरंगाबाद स्थानकावरून जाणार होती. 
करमाडमध्येही मजुरांची लगबग सुरू होती. त्या गर्दीत विठाबाईही मिसळली. तेथून बसमधून ती गर्दी रेल्वेस्थानकावर आली. गर्दीतच विठाबाई इतर मजुरांबरोबर रेल्वेत बसून झारखंडमध्ये आली. लाटेहार जिल्ह्यातील एका गुरुकुलमध्ये इतर मजुरांसोबत तीही क्वॉरंटाइन होती. मात्र, सहा महिने झाले तरी विठाबाईने क्वॉरंटाइन सेंटर सोडले नाही. 
लाटेहारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विठाबाईची माहिती काढली. तिने औरंगाबादजवळ कोळघर हे गाव असून पैठण हे माहेर असल्याचे सांगितले. 
पतीचे व भावाचे नावही सांगितले, आडनाव सांगता आले नाही. यानंतर तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. विठाबाई या तब्बल सहा महिन्यांपासून गायब असल्याचे त्यांच्या पतीने सांगितले.
औरंगाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विठाबाईला परत आणण्याकरिता एक पथक झारखंडला रवाना झाले आहे.

व्हिडिओ कॉलवरून ओळखले.
तलाठी अशोक काशीद यांनी खात्री पटावी म्हणून लाटेहारच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला. पती, मुलगा व विठाबाई यांनी एकमेकांना ओळखले. विठाबाईच्या पतीची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना विठाबाईला झारखंडमध्ये जाऊन आणणे अशक्य असल्याचे लक्षात आले. यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वखर्चाने त्यांना आणण्याचा निर्णय घेतला. महसूल विभागाने एक चारचाकी गाडी भाड्याने घेऊन कोळघरचे सरपंच, पोलिस पाटील आणि विठाबाईच्या मुलाला गुरुवारी झारखंडकडे रवाना केले.

Post a comment

0 Comments