मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदोन्नती.

मुंबई : मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल  यांना राज्य सरकारने बढती दिली. चहल यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी प्रमोशन मिळाले आहे. बढतीनंतरही इक्बालसिंग चहल हे बीएमसीच्या आयुक्तपदी कायम राहतील. 

मुंबई महापालिका आयुक्तपदी अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. चहल यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली, तेव्हा ते प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी होते. आता त्यांना अपर मुख्य सचिव श्रेणीत स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत आहे.आयुक्त इक्बालसिंग चहल यांंना आयुक्तपदी रुजू होऊन उद्या त्यांना सहा महिने पूर्ण होत आहेत. 

इक्बाल चहल यांनी 8 मे 2020 रोजी मुंबई महापालिका आयुक्‍त म्‍हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्‍यांच्‍याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्‍त कार्यभारही होता.  

इक्बाल चहल यांचा जन्म 20 जानेवारी 1966 रोजी झाला.  त्यांनी बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत 96 टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स अॅण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादित केल्यानंतर इक्बाल चहल यांनी 1989 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करून सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.

भारतीय प्रशासकीय सेवेचा 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या इक्बाल चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली आहेत.

त्‍यांच्‍या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्‍ये सोपवली होती. गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरी आधारे जानेवारी 2018 मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार 2002 देखील मिळाला आहे. फेब्रुवारी 2019 मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. 

मुंबई मॅरेथॉनमध्‍ये 2004 ते 2018 पर्यंत सलग 21 किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.

Post a comment

0 Comments