मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात

पनवेल- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. ही एसटी बस साताऱ्याहून मुंबईकडे होती. पनवेल हद्दीजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चालकासह १६ जण जखमी झाले आहेत.
एसटी बस पनवेलकडे जाणाऱ्या बाह्य वळणाजवळ आली असताना अज्ञात वाहनाला ती घासली गेली. त्यामुळे अक्षरशः बसच्या एका बाजूच्या चिंधड्या उडाल्या. त्या बाजूस बसलेले आणि झोपेत असलेले जवळपास सर्वच प्रवासी त्यामुळे गंभीर जखमी झाले.
या धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळच असलेल्या देवदूत यंत्रणेच्या तळावरून सगळे जवान त्या ठिकाणी धावले. हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीसांच्या पळस्पे टॅपचे कर्मचारी देखील काही क्षणात मदतीला आले. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि लोकमान्य हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स सेवा त्वरित उपलब्ध झाली. रेस्क्यू ऑपरेशन रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
आयआरबी आणि वाहतूक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघातातील मृत व्यक्ती मुंबईत बेस्टचा चालक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

Post a comment

0 Comments