ढाब्यावर जेवायला आलेल्या ग्राहकाची हत्या

मुंबई:- ढाब्यावर जेवायला आलेल्या ग्राहकाने अस्वच्छ टिश्यू पेपरबद्दल केलेल्या तक्रारीमुळे झालेल्या वादात ग्राहकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील मुलुंड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. २९ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव नवनाथ पवने असं असून या प्रकरणी पोलिसांनी नवनाथला मारहाण करणाऱ्या दोन वेटर आणि एका व्यक्तीला अटक केली आहे.
रामलाल गुप्ता, दिलीप भारती आणि फिरोज मोहम्मद खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. ढाब्यावर जेवायला आलेल्या नवनाथ यांनी वेटरकडे टिश्यू पेपर अस्वच्छ असल्याची तक्रार केली. ज्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. या रागातून वेटरने जेवण्यासाठी आलेल्या नवनाथला मारहाण करायला सुरुवात केली. ज्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत तरुणाच्या वडीलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर तिन्ही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली असल्याची माहिती, झोन ७ चे DCP प्रशांत कदम यांनी दिली.
मुलुंड येथील नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ आपला मित्र महेश याच्यासोबत ऑक्ट्रॉय नाक्यावर असलेल्या ढाब्यावर जेवायला गेला होता. टिश्यू पेपरवरुन झालेल्या वादातून वेटरने नवनाथच्या डोक्यावर टाईल्सने वार केला...ज्यात तो जागेवरच कोसळला. उपचारासाठी नवनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदूला आतून दुखापत झाल्यामुळे नंतर नवनाथला सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतू त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही अखेरीस रविवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. कोणत्या वेटरने नवनाथच्या डोक्यावर टाईल मारली आणि अटकेतील इतर दोन आरोपींचा गुन्ह्यात काय सहभाग होता ही माहिती पोलिसांनी दिली नाही.

Post a comment

0 Comments