भयानक : जिलेटीनच्या स्फोटात एक ठार ; शरीराचे तुकडे पाहून गावकरी गेले हादरून  

 बेळगाव : जिलेटीनच्या विचित्र स्फोटात एकजण ठार झाल्याची घटना नंदगडजवळील माचीगड येथे आज बुधवारी सातच्या सुमारास घडली. डुक्करांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे जिलेटीन बाँबचा टॅक्टर-दुचाकी अपघातानंतर स्फोट झाला. त्यात दुचाकी आणि ट्रॅक्टरचे नुकसान झाले तर दुचाकीस्वार गिरीष धर्मानंद रजपूत (वय २८, मूळ रा.हक्कीपक्की कँप-शिमोगा) याचा मृतदेह छिन्नविछीन्न स्थितीत शिवारात विखुरला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शिमोगा येथील हक्कीपक्की कँप येथील वंजारी समाजातील कुटूंबे खानापूर तालुक्याच्या विविध भागातील जंगलात जिलेटीन बाँबच्या सहाय्याने डुकरांची शिकार करतात. सध्या बिडी येथे वास्तव्यास असलेल्यांपैकी मयत गिरीश धर्मानंद रजपूत आणि त्याचा साथीदार शिवकुमार गजेंद्र रजपूत (वय २८) यांनी माचीगडच्या जंगलात रात्री जिलेटीन बाँब ठेवले होते. सकाळी शिकार न झाल्याने ते बाँब घेऊन तांड्याकडे जातांना ही घटना घडली. 
ते दोघे दुचाकीवरून नंदगडकडे जात असतांना नंदगडहून माचीगडला जाणाऱ्या ट्रॅक्टरशी टक्कर झाली. दुचाकीवर मागे बसलेला गिरीश याच्या हातातील बाँब असलेली पिशवी ट्रॅक्टरच्या मागील टायरखाली सापडल्याने मोठा स्फोट झाला.

Post a comment

0 Comments