व्यावसायिकाचे घर फोडले, दीपनगरातील घटना : दोन लाख रोखसह दागिने लंपास.

औरंगाबाद : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना दीपनगरातील मुथियान रेसीडेन्सीमध्ये घडली. जवाहरनगर पोलिसांकडून रेसीडेन्सीमधील सीसी टिव्ही फुटेज तपासण्याचे काम दिवसभर सुरू होते.
लॉकडाऊनच्या काळात कपड्याचे दुकान बंद पडल्याने विशाल सुखलाल सोकिया (33, रा. फ्लॅट क्र. 2, मुथियान रेसीडेन्सी) यांनी घरात व्यवसाय सुरू केला आहे. 
21 नोव्हेंबर रोजी सोकिया हे कुटुंबियांसह कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील सासूरवाडीला गेले होते. त्यानंतर चोराने संधी साधून फ्लॅटचा लाकडी दरवाजा फोडला. त्यातून आत प्रवेश करत कपाटाच्या ड्रॉवरमधील दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबवले. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास सोकिया हे कुटुंबियांसह घरी परतले. त्यावेळी त्यांना दरवाजा फोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेचच घरात धाव घेतली. 

तेव्हा कपाटातील दोन लाखांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर सोकिया यांनी घटनेची माहिती तात्काळ जवाहरनगर पोलिसांना दिली. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक भरत पाचोळे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. 

घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी परिसरातील सीसी टिव्हींची तपासणी केली. 
याप्रकरणी सोकिया यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भरत पाचोळे करत आहेत.

कपाटाला लॉक नव्हते : घराला कुलूप लावून बरेचसे नागरिक बिनधास्तपणे कपाटाला चावी तशीच ठेऊन किंवा बंद न करता निघून जातात. विशेषत: कपाटातच रोख आणि दागिने ठेवले जातात. 

हे चोरांना ज्ञात आहे. त्यामुळे चोरी करताना थेट कपाटाच्या दिशेनेच चोरांची धाव असते. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. 

सोकिया यांनी देखील कपाटाला लॉक लावले नव्हते. त्यामुळे चोरांना जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. अशी माहितीही जवाहरनगर पोलिसांनी दिली.

Post a comment

0 Comments