मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या ५० पेक्षा अधिक व्यक्तींवर गुन्हे

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी शिवसेनेचा कायदा कक्ष मैदानात उतरला आहे. ठाकरे पिता-पुत्रांसंदर्भात अवमानकारक शेरेबाजी करणाऱ्या ५० व्यक्तींवर राज्यात विविध ठिकाणी १० गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यातील बहुतांश व्यक्ती भाजपच्या पाठीराख्या आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबर या काळात लिगल सेलने पुढाकार घेऊन १० पेक्षा अधिक गुन्हे नोंद केले आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या लिगल सेलचे प्रमुख अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अवमानजनक टिप्पणी कदापि खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये नवी मुंबईतील परेश बोरसे या युवकाने मुख्यमंत्र्यांविषयी फेसबुकवर आपत्तीजनक टिप्पणी केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली होती. नवी मुंबईच्या सुनयना होले यांना अशाच प्रकरणी मुंबईच्या सायबर सेलने अटक केली होती. साहिल चौधरी या यूट्यूबरने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते तेव्हा त्याच्याविरोधात शिवसेनेने तक्रार नोंद केली होती. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
दिल्लीस्थित अॅड. विभाेर आनंद याने सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी ठाकरे पिता-पुत्रावर अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा नोंद आहे. नागपूरच्या समीत ठक्कर यास अटक करण्यात आली. त्याने मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याविषयी असभ्य भाषा वापरली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्याने ‘माॅडर्न डे ऑफ औरंगजेब’ आणि आदित्य ठाकरे यांची ‘पेंग्विन बेटा’ अशी टीका केली होती.

Post a comment

0 Comments