भाजप संसदीय मंडळावर फडणवीसांची वर्णी शक्य, बिहार निवडणुकीनंतर रिक्त ४ पदे भरणार

मुंबई:- बिहार निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पक्षाच्या संसदीय मंडळातील रिक्त चार पदे भरण्याची तयारी करत आहेत. भाजप सूत्रांनुसार, सध्याच्या समीकरणांनुसार यापैकी एक पद महिलेला मिळणे निश्चित आहे. यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण वा वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणींची वर्णी लागू शकते. इतर तीन पदांसाठी पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची नावे सर्वात पुढे आहेत.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व आसाम सरकारमधील मंत्री हेमंत बिस्वसरमा यांचीही नावे चर्चेत आहेत. यात भूपेंद्र यादव सर्वा प्रबळ दावेदार मानले जात आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर व पीयूष गोयल यांच्याही नावांची चर्चा आहे. योगींना स्थान मिळाल्यास शिवराज चौहान यांच्यानंतर संसदीय मंडळात ते दुसरे मुख्यमंत्री ठरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांनंतर देशात सर्वात सभा योगींच्याच होतात.
व्यंकया नायडू उपराष्ट्रपती झाल्याने तर अनंतकुमार, सुषमा स्वराज व अरुण जेटलींच्या निधनानंतर संसदीय मंडळात ४ जागा रिक्त आहेत. सध्या त्यात पीएम मोदींसह जे.पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, थावरचंद गहलोत, शिवराजसिंह चौहान व बी.एल. संतोष हे आहेत.

Post a comment

0 Comments