गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. पण आता 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत आता जिल्ह्यातील गड किल्ले आणि डोंगर कड्यांवर ट्रेकिंगसाठी जाता येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'ट्रेकिंग'ला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे निश्चितच ट्रेकर्सला दिलासा मिळाला आहे. 
 त्यानुसार ट्रेकिंगच्या एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. ग्रुपमधील सदस्य संख्या अधिक असल्यास वेगवेगळे ग्रुप करून वेळेमध्ये फरक ठेवावा. ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच योग्य ते शारीरिक अंतर राखण्याबाबतचा नियम पाळण्यात यावा. दहा वर्षांच्या आतील मुले आणि पासष्ट वर्षांवरील व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये.  ताप, सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्तींचा सहभाग टाळावा. स्थानिकांच्या घरात भोजन आणि मुक्काम, त्याचप्रमाणे सदस्यांनी इतरही एकत्रितपणे मुक्काम करू नये. एकमेकांच्या वस्तू उदा: मोबाईल, कॅमेरे एकमेकांनी हाताळू नयेत. 
या अटींचा भंग केल्यास आणि विषाणू संसर्ग होईल असे कृत्य केल्यास ही परवानगी रद्द केली जाईल तसेच संबंधितांविरुद्ध आपत्ती कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला सूचित केले आहे. 

Post a comment

0 Comments