कंपाउंडरच्या पोटात खुपसला चाकू, दवाखाना बंद करून हल्लेखोर फरार.

नाशिक : येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान  धक्कादायक प्रकार घडला. खासगी रुग्णालयात डॉक्टर कुठे आहे, हे विचारण्याच्या बहाण्याने कंपाउंडरवर अज्ञात हल्लेखोराने चाकू हल्ला केला आहे.
या घटनेमुळे अंदरसूल गावात एकच खळबळ उडाली आहे .
येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज (9 नोव्हेंबर) सकाळी सात वाजेच्या दरम्यान  डॉक्टर राजे भोसले या खासगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून कामाला असलेला शिवाजी पैठणकर याच्यावर अज्ञात हल्लेखोराने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. 
पेशंट म्हणून हा हल्लेखोर रुग्णालयात आला. कंपाउंडर शिवाजी पैठणकर यांनी त्याची विचारणा केली. तेव्हा डॉक्टर कुठे आहे, असे या हल्लेखोराने विचारले. मात्र, शिवाजी पैठणकर काही उत्तर देतील त्यापूर्वीच या हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि रुग्णालयातून पळ काढत बाहेरचे दार बंद केले. याबाबत ग्रामस्थांना माहिती  मिळताच, त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. 
मात्र, हा अज्ञात हल्लेखोर फरार झाला. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत कंपाउंडर शिवाजी पैठणकर यांच्याकडून माहिती घेऊन परिसरात नाकेबंदी केली आहे. या अज्ञात हल्लेखोराचा पोलिस कसूर शोध घेत आहे. 
कंपाउंडर शिवाजी पैठणकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांने चाकूहल्ला केल्याचे कारण अस्पष्ट असल्याने येवला तालुका पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Post a comment

0 Comments