वडिलोपार्जित शेतीच्या वादातून गोळीबार , दोघांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी.

औरंगाबाद - वडिलोपार्जित शेतीच्या वादातून तरुणावर पिस्टलने गोळीबार केलेल्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. शेख बाबर शेख शेरु (२८, रा. हमीजा गार्डन, गट क्र. ८३, बीडबायपास) आणि शेख अल्ताफ शेख अन्वर (१९, रा. गल्ली क्र. ६, सादातनगर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शेवगाव तालुक्यातील इम्रान अहेमद शेख (२५, रा. मुंगी, जि. अहमदनगर) याचा चुलते शेख युनुस शेख चांद (रा. आमराई, बीडबायपास) याच्याशी वडिलोपार्जित शेतीवरुन वाद आहे. यापुर्वी चुलता शेख युनुस याने इम्रानविरुध्द खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सतत जीवे मारण्याची धमकी यापुर्वी दिली होती. 

२९ आॅक्टोबर रोजी इम्रान मित्र जावेद खान याला भेटण्यासाठी सादातनगरात गेला होता. त्याला  भेटल्यानंतर तो दुचाकीने (एमएच-२०-बीबी-२०२०) सिल्कमिल कॉलनी येथील बहिण शेख शबाना हिच्या घरी जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास सादातनगरातील रिक्षा स्टँडपासून शंभर मीटर अंतरावर पाठीमागून दुचाकीवर शेख बाबर आणि शेख अल्ताफ आले. त्यापैकी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने पिस्टलने इम्रानवर गोळी झाडली. 

ही गोळी इम्रानच्या डाव्या मांडीत घुसली. त्याचवेळी दोघांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. तसेच पुन्हा पिस्टल लोड करुन दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्टल लोड झाली नाही. त्यामुळे पिस्टलमधून दुसरी गोळी सुटली नाही. त्यावेळी इम्रानने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही दुचाकीवर बसून पसार झाले. या घटनेनंतर इम्रान जखमी अवस्थेत बहिण शबाना शेख हिच्या घरी गेला. 

तिला घटनेची माहिती दिल्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी पत्र दिल्यानंतर इम्रानने घाटीत उपचार घेतले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी इम्रानचा जवाब नोंदवला. त्यावरुन शुक्रवारी पहाटे सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील कराळे करत आहेत.


Post a comment

0 Comments