शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम

नाशिक:- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या २ डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे. 
मराठा क्रांती मोर्चाची आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं आहे. येत्या २ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढण्यात येईल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. 
मराठा क्रांती मोर्चाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकार आता कोंडीत सापडले आहे. येत्या २ डिसेंबर रोजी राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. यात मराठा आरक्षणाशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोवर मार्गी लागत नाही तोवर प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या याच भूमिकेवर मराठा समाजात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

Post a comment

0 Comments