जळगावात राडा , माजी महापौरांच्या मुलाचा खून.

जळगाव शहरात सध्या कारणावरून  टोळीयुद्धाचा भडका उडाला. बुधवारी रात्री दोन जणांनी तलवार व चॉपरने वार करीत माजी महापौरांच्या मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ घडली. मृत राकेश (वय २८ रा. शिवाजी नगर) हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मारेकरी गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिकनगर) आणि विशाल संजय सपकाळे (साळुंखे, रा. प्रजापतनगर) या दोघांना अटक केली आहे.



या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेशचा लहान भाऊ सोनू सपकाळे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, तो  हा रात्री सव्वा अकरा वाजता सलमान शेख युसूफ याच्यासोबत वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी दुचाकीने शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून जात होता. यावेळी विशाल व एक तरूण पाठीमागून दुचाकीने येत होते. त्यांना पुढे जाण्यासाठी साइड दिली नाही म्हणून त्यांनी वेगाने पुढे येत दुचाकी आडवी लावली. तर यानंतर आणखी एका दुचाकीवर गणेश सानवणे व दोन अनोळखी तरूण देखील तेथे पोहोचले. त्या तरुणांनी लाथ मारून त्याची दुचाकी खाली पाडली. 

यांनतर गणेश याने हातातील तलवार त्याच्या  डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने डोक्यावरचा वार चुकवला. मात्र, हाताला दुखापत झाली. यानंतर सर्वांनी सोनूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

याचवेळी सोनूचा मोठा भाऊ राकेश व त्याचा मित्र सचिन लढ्ढा हे दोघे चारचाकीने घटनास्थळी पोहोचले. राकेशने सुरूवातीला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी गणेशने राकेशच्या मांडीवर तलवारीने वार केले. सोबत असलेल्या विशालने चॉपरने डोक्यात वार केले. या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाला होता. 

दरम्यान घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याने हल्लेखोर पसार झाले. यानंतर सोनूने दुचाकीने घरी जाऊन मोठा भाऊ राजू याच्यासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी येत जखमी राकेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. 

या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. गुरुवारी पहाटे सोनू याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पहाटेच्या सुमारास गणेश सोनवणे व विशाल यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर संशयित बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Post a comment

0 Comments