मराठवाड्यात भाजपच्या अडचणींत वाढ, जयसिंगरावांची पक्षाला सोडचिठ्ठी.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाडांनी भाजपला मोठा धक्का दिल्याचे कळते.
औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाडांनी भाजपला मोठा धक्का दिल्याचे कळते. त्यांनी मंगळवारी (दि. 17) भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यांनी भाजपात भेदभाव आणि उपेक्षा होत असल्याचे कारण सांगून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसते.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकरांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाडांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 
परंतु, आता जयसिंगरावांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे. त्यांच्या या निर्णयाने भाजपच्या अडचणींत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
आज (दि.17) त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मेलव्दारे राजीनामा पाठवला आहे. 
माजी मंत्री आज पदवीधर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने जयसिंगराव गायकवाड हे पदवीधर निवडणूकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा राजू गायकवाड यांनी दिली.
त्यांनी यापूर्वी दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे.
 मागील काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड राजकारणापासून दूर होते. परंतु आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा दाखवली होती.

Post a comment

0 Comments