बांगलादेशात रेल्वेमार्गे होणारी निर्यात थांबली; शेतकऱ्यांचे नुकसान

नागपूर : नागपुरी संत्री अशी खास ओळख असलेल्या संत्र्याला देशविदेशात असलेली मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने बांगलादेशात रेल्वेद्वारे संत्री पाठवण्याचे नियोजन केले. मात्र तेथील स्थानकावर ३० डब्यांची गाडी उभी राहू शकेल इतका मोठा फलाट नसल्याने या संत्र्यांचा बांगलादेशपर्यंत होणारा रेल्वे प्रवास अद्याप सुरू झालेला नाही.
बांगलादेशात नागपुरी संत्र्याची मोठी मागणी आहे. सध्या रस्तेमार्गाने संत्री पाठवली जातात, परंतु त्याला खर्च अधिक येतो. रेल्वेद्वारे संत्री पाठवल्यास वाहतूक खर्च २० ते ३० टक्क्याने कमी होईल व वेळेचीही बचत होईल. तसेच यामुळे संत्री उत्पादकांनाही अधिक पैसे मिळतील, या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून महाऑरेंजच्या मदतीने बांगलादेशात रेल्वेद्वारे संत्री पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची बैठकही गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडली होती.
यासंदर्भात महाऑरेंजचे सल्लागार श्रीधर ठाकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमची सर्व तयारी झाली आहे. फक्त बोनापोलमध्ये फलाटाची सोय नसल्याने काम थांबले आहे. ते पूर्ण झाल्यावर संत्री पाठवली जातील. दरम्यान, गडकरी यांच्याच प्रयत्नाने दिल्लीकडे जाणारी किसान रेल सुरू झाली. त्याद्वारे दिल्ली येथे सध्या संत्री पाठवली जात आहेत. त्यामुळे मागणी वाढली असून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे. या रेल्वेद्वारे शेतकरी स्वत: संत्री पाठवू शकतात याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.

Post a comment

0 Comments