भाजप आमदार राम कदम यांची पोलिसांकडून सुटका.

पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबई ते पालघर जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते.
मुंबई - पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबई ते पालघर जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. 
परंतु त्याआधीच राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता राम कदम खार पोलीस ठाण्यातून बाहेर आले असून त्यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. 
'हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची,' प्रतिक्रिया राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
राम कदम यांच्या समर्थकांनी या जनआक्रोश यात्रेसाठी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या जात होत्या. 
राम कदम पालघरच्या दिशेने जाण्यासाठी घराबाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच राम कदम ज्या गाडीतून प्रवास करणार होते, ती गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. 
गाडीवर लावण्यात आलेले काळे झेंडेही पोलिसांनी काढले. तसेच त्या परिसरातील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी हटवले होते. राम कदम यांची समजूत काढण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला होता.
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना कांदिवली येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश करणार्‍या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र आणि दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. 
याप्रकरणी पोलिसांनी 154 जणांना अटक केली असून 11 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

Post a comment

0 Comments