खासदार शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सोडले टीकास्त्र.नाईक कुटुंबाबद्दल सहानुभूती नाही का?; शरद पवारांचा राज्यपालांना चिमटा.

पुणे : ‘राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्या काळजीपोटी दूरध्वनीवरून राज्य सरकारशी संवाद साधला, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ज्या कुटुंबातील दोन व्यक्तींनी आत्महत्या केली, त्यांच्याबद्दलही थोडी सहानुभूती दाखवली असती, तर बरे झाले असते,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदारशरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडले.
अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना गेल्या बुधवारी सकाळी रायगड पोलिस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून अटक केली. 

त्यानंतर त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून गोस्वामी यांची सुरक्षा व त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. 
गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची; तसेच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत. 
यापूर्वीही राज्यपालांनी देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पुन्हा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद पेटला आहे. याबाबत पवार म्हणाले, की नाईक कुटुंबातील दोन व्यक्तींनी आत्महत्या केली. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी थोडी सहानुभूती दाखवली असती, तर लोकांना बरे वाटले असते. 
‘करोनाचा प्रसार होऊ नये, याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी आवाहन केले आहे. त्यामुळे या वेळी दिवाळीत आपण लोकांना न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती पवार यांनी दिली.


Post a comment

0 Comments