उत्पन्न वाढीसाठी मनपाचा कॉर्पोरेट पॅटर्नशहरात सात ठिकाणी स्वतःचे पेट्रोल पंप सुरू करणार.

औरंगाबाद : महापालिकेने आता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीच्या दृष्टीने कॉर्पोरेट पॅटन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 
शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा वापरात घेऊन सात ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे. इतर सहा ठिकाणच्या जागा देखील अंतिम केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यापूर्वी शहरात पालिकेने स्वतःच्या गाड्यांसाठी मध्यवर्ती जकात नाका परिसरात इंधन पंप सुरू केला होता. मात्र याठिकाणी केवळ पालिकेच्या वाहनांतच डिझेल भरण्याची व्यवस्था होती. पुढे या पंपावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाने तो बंद केला. तेव्हापासून आजवर पालिका खासगी पेट्रोलपंचालका कडून कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल, डिझेल खरेदी करत आहे. 
आयुक्त पांडेय आल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या धर्तीवर पालिकेनेही शहरात पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्यवर्ती जकात नाका परिसरातील पालिकेची जागा इंडियन ऑईल कंपनीला 20 वर्षासाठी भाडेतत्वावर दिली आहे. 
कंपनी स्वखर्चातून पंप उभारून पालिकेला देणार आहे. येथे कर्मचारी पालिकेचे राहणार असून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणारा नफा देखील पालिकेला मिळणार आहे. तसेच जागेचे भाडे सुद्धा पालिकेला मिळेल. पेट्रोल, डिझेलची खरेदी मात्र इंडियन ऑईल कंपनीकडून बंधनकारक आहे. याच धर्तीवर आणखी सहा ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचे आता आयुक्त पांडेय यांनी ठरवले आहे. या कॉर्पोरेट पॅटर्नच्या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरवर्षी इंधनावरच मनपाचा पाच कोटींचा खर्च : पालिका खासगी पंपचालकांकडून डिझेल पंप बंद केल्यापासून पेट्रोल-डिझेलची खरेदी करते. याकामी वर्षभराची निविदा नित्याने काढली जात आहे. 
शहरातील सेव्हनहिल उड्डाणपुलालगतच्या एका पंपाकडून वार्षिक तब्बल पाच कोटी रुपयांचे इंधन पालिका वाहनांना लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Post a comment

0 Comments