डोक्यात घातला दगड; अत्याचारानंतर विवाहितेचा दोघांनी केला खून

केज:- साळेगावमध्ये शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा शुक्रवारी दुपारी खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत व पथकाने अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून अजय ऊर्फ धनराज दत्तात्रय इंगळे व पंकज भगवान जाधव दोन तरुणांना अटक केली. महिलेवर दोघांनी अत्याचार केला, नंतर तिचा गळा आवळला आणि नंतर डोक्यात दगड घातला, असा आरोपींनी पोलिसांसमोर खुनाचा घटनाक्रम उलगडला. साळेगाव येथील अश्विनी समाधान इंगळे (२४) ही महिला ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ‘दस्तगिराचा माळ’ नावाच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. तिचा गळा आवळून आणि कपाळ दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करून विवस्त्र अवस्थेतील मृतदेह राहुल श्यामराव जाधव यांच्या कपाशीच्या शेतात टाकून मारेकरी पसार झाले होते. मृतदेहाजवळ दगड, स्कार्फ, तर मृतदेहापासून काही अंतरावर कानातील एक दागिना, हेअर पिन, वेचून ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, पायातील एक बूट व दुसरा बूट काही अंतरावर पडलेला आढळून आला होता. मृत महिलेचे वडील सर्जेराव भीमराव सोनवणे (रा. सारणी आ., ता. केज) यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध केज पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सपोनि संतोष मिसळे, उपनिरीक्षक श्रीराम काळे, दादासाहेब सिद्धे यांनी भेट देत पाहणी केली होती.
२४ तासांनंतर झाले अंत्यसंस्कार, दोन मुलांचे मातृछत्र हरवले
महिलेच्या मारेकऱ्यांना अटक केल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्या दोघांनी अत्याचार व खुनाची कबुली दिल्याची माहिती दिल्यानंतर नातेवाइकांनी शनिवारी दुपारी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले. महिलेस एक चार वर्षांचा आणि दुसरा दोन वर्षांचा अशी दोन मुले आहेत. त्यांचे मातृछत्र हरपले.
स्थानिक गुन्हे शाखेने मृत महिलेचा मोबाइल ताब्यात घेतला होता. या मोबाइलमधील काॅल डेटा व इतर पुरावे मिळवून पीआय भारत राऊत यांनी शुक्रवारीच खबऱ्यांमार्फत माहिती काढली. महिलेच्या खुनाशी गावातील धनराज ऊर्फ अजय इंगळे, पंकज भगवान जाधव या दोन तरुणांचा संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली. तांत्रिक पुरावेही त्यांच्याच बाजूने होते. यानंतर शुक्रवारी रात्रीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली.
बदनामी होईल म्हणून खून
पंकज आणि धनराज दोघे अविवाहित आहेत. पंकज पदवीधर असून धनराज ट्रॅक्टरचालक आहे. तो काही दिवसांत कारखान्यावर जाणार होता. पंकजच्या घरी त्याच्या एका बहिणीचा विवाह काही महिन्यांवर आला आहे. अत्याचारानंतर महिलेने दोघांनाही “हा प्रकार तुमच्या घरी सांगेल, माझ्या पतीला सांगेल’ असे म्हटले होते. त्यामुळे आता आपली बदनामी हाेईल, बहिणीचे लग्न मोडेल, आपले लग्न होणार नाही म्हणून महिलेला संपवण्याचा निर्णय दोघांनी घेतला.
एसपी आर. राजांच्या मार्गदर्शनात या पथकाने केली कारवाई : एसपी आर. राजा, एएसपी सुनील लांजेवार, डीवायएसपी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, कर्मचारी बालाजी दराडे, हनुमान खेडकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, राहुल शिंदे, संजय जायभाये यांनी ही कारवाई केली.
विवाहित महिलेच्या मृतदेहाजवळ एक गुटख्याची पुडी आढळून आली होती. ट्रॅक्टरचालक असलेला अजय ऊर्फ धनराज याला गुटखा खाण्याची सवय होती. या तपासात तांत्रिक पुराव्यासोबत या गुटख्याच्या पुडीच्या ‘क्लू’नेेही पोलिसांना आरोपींचा माग दाखवण्यात मदत केली. महिलेच्या संपर्कात आलेली कोणती व्यक्ती गुटखा खाते याची माहिती पोलिसांनी काढली यातून अजयचे नाव समोर आले.
दिशाभूल करण्याचाही ‘प्लॅन’
मृत महिला पंकजच्या शेतात कामाला येत असे. शुक्रवारी महिलेच्या खुनानंतर ती आपल्या शेतात येणार होती. मात्र, ती आली नाही असा बोभाटा पंकजने केला. यासाठी तिच्या मोबाइलवर एक-दोन वेळा संपर्क केला, नंतर तिच्या पतीशीही संपर्क केला व आपण सकाळपासून महिलेला भेटलोच नाही असे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याचा हा बनाव उघडा पडला आहे.

Post a comment

0 Comments