चोरून परराज्यात कारची विक्री करणारी टोळी जेरबंद. गुन्हा दाखल होताच टोळीच्या मुसक्या आवळल्या.

चोरून परराज्यात कारची विक्री करणारी टोळी जेरबंद.
गुन्हा दाखल होताच टोळीच्या मुसक्या आवळल्या.

औरंगाबाद : कार चोरुन परराज्यात तिची विल्हेवाट लावणा-या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीने औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, परभणी, जळगाव, अहमदनगर येथून कार चोरी केल्या होत्या. कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासात टोळीला जेरबंद केले. शेख दाऊद शेख मंजूर (55, रा. धाड, जि. बुलढाणा), शेख नदीम शेख दाऊद (22, रा. धाड, जि. बुलढाणा, ह. मु. देऊळगांव राजा, जि. बुलढाणा), शेख जिशान शेख दाऊद (28, रा. धाड, जि. बुलढाणा, ह. मु. घाटनांद्रा ता. जि. बुलढाणा), सखाराम भानुदास मोरे (31, रा. निरखेडा ता. जि. जालना) आणि दीपक दिगंबर मोरे (20, रा. निरखेडा ता. जि. जालना) अशी टोळीतील कार चोरांची नावे आहेत. बुलढाण्यातील महेश किशोरराव भोसले (37, रा. देऊळगांव राजा) हे 21 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास कन्नड येथील मावशी कमळाबाई देशमुख यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी मावशीच्या घरासमोर कार (एमएच-21-एएक्स-3004) उभी केली होती. तर त्यांचा मावस भाऊ नितीन देशमुख याची कार (एमएच-20-डिजे-6488) कन्नडमधील एलआयसी ऑफीसच्या पार्कीगमध्ये उभी होती. त्याची कार मध्यरात्री चोरांनी बनावट चावीने लांबवली. हा प्रकार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आल्यावरुन कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर घटनास्थळावरील सीसी टिव्हीची स्थानिक गुन्हे शाखेने तपासणी केली होती. तसेच तांत्रिक दृष्ट्या तपासाला सुरूवात केली. तेव्हा शेख दाऊद याने साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिखलीमध्ये शोध घेतला. त्यावेळी चिखलीतील रोहिदासनगरात शेख दाऊद, शेख नदीम, शेख जिशान, सखाराम मोरे आणि दीपक मोरे यांना पकडले. त्यांच्याकडून तीन कार व दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच कन्नडमधून चोरलेल्या कारची नंबर प्लेट बदलली असल्याची कबुली दिली.

परभणी, जालना, जळगावमध्येही चोर्‍या : चौकशीदरम्यान आरोपींनी परभणीतील सेलू येथून ऑक्टोबर 2020 मध्ये कार चोरल्याची कबुली दिली. तर देशमुख यांची कार चिखलीतील कुंभारवाडा भागातून हस्तगत करण्यात आली. त्यांच्याकडून सात मोबाईलही जप्त करण्यात आले. या टोळीविरुध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या टोळीने जालना, परभणी, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातून कार चोरुन साथीदारांच्या मदतीने इतर राज्यात विक्री केल्याची कबुली दिली.

Post a comment

0 Comments