मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची काँग्रेसची घोषणा, महाआघाडीत खळबळ.


मुंबई 19 नोव्हेंबर: मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही घोषणा केलीय. महाविकास आघाडीमध्ये जरी काँग्रेस शिवसेनेसोबत असली तरी महापालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या घोषणेमुळे महाआघाडीत खळबळ उडाली आहे. या आधी येणाऱ्या सर्व निवडणुका या एकत्रितपणे लढविल्या जातील अशी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुका असून काँग्रेसच्या या घोषणेमुळे आघाडीच्या घोषणेचं काय असा प्रश्न आता विचारला जातोय. शिवसेनेनेसोबत गेलं तर पारंपारिक मतदार दुरावण्याची भिती काँग्रेसला वाटते आहे. त्यामुळे या निवडणुका या स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचं बोललं जातंय.विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून फारकत घेत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर सेना-भाजपमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगत आहे. अशातच आता शिवसेनेचं वर्चस्व असणारी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजप कार्यकारिणीत याबाबतची घोषणा झाली.कांचं बिगुल फुंकलं आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई आणि शिवसेना हे समीकरण घट्ट झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र आता शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे गेले होते. तेव्हा शिवसेनेला सत्ता राखण्यात यश मिळालं असलं तरीही भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फारसं अंतर नव्हतं.या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसोबत राज्याच्या राजकारणात संघर्ष होत असतानाच भाजपने मुंबई महापालिकेवरही लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीबाबत आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी होतात, हे पाहावं लागेल.

Post a comment

0 Comments