सामाजिक संदेश : नगरमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केले साध्या पद्धतीने रजिस्टर लग्न.

लग्नाऐवजी शिक्षणासाठी खर्च करण्याचा संदेश समाजाला द्यायचा, असा या दाम्पत्याचा निर्णय.

अहमदनगर : लग्न म्हटले की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा क्षण. हा क्षण विशेष करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवली जातात. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि लग्न सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी वाटेल ते करण्याची वधू आणि वराची तयारी असते.

परंतु अहमदनगर जिल्ह्यातील यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएफएस अधिकारी झालेले चंद्रशेखर परदेशी आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या शुभाली परिहार यांनी लग्नाचा वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे. गाजावाजा न करता अत्यंत सध्या पद्धतीने रजिस्टर लग्न केले.
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावातील चंद्रशेखर परदेशी हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. शालेय शिक्षण गावातच पूर्ण झालं. नंतर पुण्यात इंजिनिअरिंग केलं. 

बाहेर इंजिनिअरला मिळणारा पगार पाहून स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला. मन लावून अभ्यास केला आणि 2018 साली सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाला. चंद्रशेखर परदेशी हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात आयएफएस अधिकारी आहेत. असाच काहीसा परिचय शुभाली परिहारचा आहे. 

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या चालबुर्ग गावातील शिक्षकाच्या कुटुंबातील मुलगी. पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करुन पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. शुभाली परिहार या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. दोघांच्या नातेवाईकांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. 

लग्न जुळली मात्र दोघंही एका गोष्टीवर ठाम होते. ती म्हणजे लग्न गाजावाजा करुन करायचं नाही तर रजिस्टर पद्धतीने करायचं. याचं मोठं कारण म्हणजे आजही लोक मुलाच्या लग्नासाठी मोठा खर्च करतात, परंतु शिक्षणात खर्च करत नाहीत. त्यामुळे आपण स्वतः रजिस्टर पद्धतीने लग्न करुन लग्नाऐवजी शिक्षणासाठी खर्च करण्याचा संदेश समाजाला द्यायचा, असा निर्णय या दाम्पत्याने घेतला होता. 

चंद्रशेखर आणि शुभाली हे दोघेही उच्चपदस्थ असूनही कुठलाही गाजावाजा न करता साधेपणाने लग्न करुन एक वेगळा आदर्श नवीन पिढीसमोर ठेवला आहे.

Post a comment

0 Comments