मोदींना प्रचारासाठी घेऊन या, तुमच्या किती जागा येतात बघू; ओवेसींचं भाजपला थेट आव्हान

हैदराबाद: महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरून हैदराबादमध्ये राजकारण तापलं आहे. मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे (एमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिलं आहे. भारतीय जनता पक्षानं मोदींना प्रचारासाठी बोलवावं. त्यांच्या किती जागा निवडून येतात पाहू, असं ओवेसींनी म्हटलं आहे. हैदराबादमध्ये डिेसेंबरच्या सुरुवातीला पालिकेची निवडणूक आहे.
तुम्ही नरेंद्र मोदींनी हैदराबादमध्ये बोलवा आणि प्रचार करा. मग काय होतं, ते आम्ही पाहू. त्यांना इथे सभा घेण्यास सांगा. तुमच्या किती जागा निवडू येतात ते आम्ही बघतो, असं आव्हान ओवेसींनी भाजपला दिलं. महापालिका निवडणुकीसाठी मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा घेऊन मतांचं ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप ओवेसींनी केला आहे.
'हैदराबादमध्ये महापालिकेची निवडणूक आहे. पण ते विकासाबद्दल बोलणार नाहीत. हैदराबाद विकसित शहर आहे. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं आहेत. पण भाजपला हैदराबादची ही ओळख पुसायची आहे. त्यांना हैदराबादची प्रतिमा मलीन करायची आहे,' असे गंभीर आरोप ओवेसींनी केले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सातत्यानं ओवेसींना लक्ष्य करत आहेत. हैदराबादचे पक्षाध्यक्ष बंडी संजय आणि दक्षिण बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी हैदराबादमध्ये घुसखोरी होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे.
हैदराबादमधील रोहिंग्या आणि पाकिस्तानी लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करू, असं विधान बंडी संजय यांनी केलं होतं. तर खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींची तुलना थेट मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी केली होती. ओवेसी म्हणजे आधुनिक जिन्ना आहेत. ते जुन्या हैदराबादमधील हजारो रोहिंग्यांचं संरक्षण करत आहेत, असा गंभीर आरोप सूर्यांनी केला होता.

Post a comment

0 Comments