बोराळकरांसाठी एकाचे तिकिट कापले ; पंकजा मुंडे.

बोराळकरांसाठी मी एकाचे तिकिट कापले, अशा शब्दांत राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडेनी यांनी भाजपच्या कोअर कमिटीवर निशाणा साधला.

औरंगाबाद (उद्धव भा. काकडे) : भाजपने शिरीष बोराळकर यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र या निवडणूकीसाठी तयारी करणार्‍या भाजपच्या राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका कार्यकर्त्यास उमेदवारी मिळू शकली नाही. 
परिणामी, मुंडे या नाराज असल्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र ही केवळ अफवा असल्याचे मुंडे यांनी गुरूवारी दि.12 भाजपच्या विभागीय प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. परंतु, बोराळकरांसाठी मी एकाचे तिकिट कापले, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीवरही निशाणा साधला.  

मराठवाडा पदवीधर निवडणूकीसाठी भाजपचे शिरीष बोराळकर यांनी गुरूवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सेव्हन हिल परिसरात राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विभागीय प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, पदवीधर निवडणुकप्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाषणात पंकजा मुंडेंनी भाजपच्या कोअर कमिटीवरच निशाणा साधत आपल्या मनातील खदखद व्यक्‍त केली. त्या म्हणाल्या की, मी आज येणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र मी आलेली आहे. 
दिवाळीचा सीझन असल्यामुळे आज विमाने कमी होती. सर्वच विमाने बूक होती. बोराळकर, अतुल सावे, बागडे नाना यांची मात्र मी यावे यासाठी सारखी धडपड चालू होती. त्यामुळे मी सातासमुद्रापार आलेली आहे की काय, असे मला वाटत होते. मात्र आम्हाला माणूसच सापडत नव्हता. 
शेवटी एकाचे तिकिट कापले आणि मी इथपर्यंत आले, असे सांगत मुंडे यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या निर्णयावर निशाणा साधला. भाषणाच्या शेवटी मी जर आले नसते बाकीच्या उमेदवारांनाही बरे वाटले असते, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात राज्यातील आपले राज्य गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना या निवडणूकीत जिंकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. 
तथापि, भाजपकडून पंकजा मुंडे यांचे विश्‍वासू प्रविण घुगे हे इच्छुक होते. त्यांनी या मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीही केली होती. दुसरीकडे जयसिंगराव गायकवाड, किशोर शितोळे यांचीही नावे स्पर्धेत होती. मात्र ऐनवेळी पक्षाने शिरीष बोराळकरांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 
सोशल मीडियावरही पंकजा मुंडे नाराज असल्याच्या, तसेच बंडखोरी होण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कोअर कमिटीवर साधलेला निशाणा हा निश्‍चितच पक्षातील अंतर्गत गटबाजी दर्शविणारा आहे.

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष : पंकजा मुंडे पुढे त्या म्हणाल्या, बंडखारी झाली, अमूक झाले. या सर्व अफ वा आहेत. अशा अफ वांवर विश्‍वास ठेवू नका. 
मी गोपीनाथ गडावर सांगितले आहे की, भाजतीय जनता पार्टी हा माझ्या बापाचा पक्ष आहे, हा अहंकार नसून प्रेम आहे. या प्रेमामुळे पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेला उमेदवार सर्वतोपरी विजयी व्हावा, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. म्हणून त्या संस्काराने आम्ही आता पूर्णपणे सजगतेने कामाला लागलेलो आहोत. 
मंचावरील सगळे कामाला लागले आहेत. आता तुम्हीही भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा. 
पूर्वी हा भाजपचा मतदारसंघ होता, तो पुन्हा भाजपचा करण्यासाठी आजपासून सर्वांनी जोरात प्रचारयंत्रणा राबवावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केले. कुणाला निमंत्रण मिळाले नाही, कुणाला पान-सुपारी मिळाली नाही, याचा राग मानू नका, असेही त्यांनी टोकले.

निर्णयापूर्वी बोराळकरांशी दोन तास चर्चा : पक्षाची बैठक असते तेव्हा आपल्याला तीन-चार उमेदवार निवडायचे असतात. तेव्हा आपण पोटतिडकीने उमेदवारीसाठी प्रयत्न करतो. चार निवडणूका आहेत. सर्व प्रकारचे संतुलन असावे. 
सर्व वर्गांना समान संधी मिळावी, यावर विचार करावा लागतो. उमेदवारीचा निर्णय होण्याच्या आधी मी शिरीष बोराळकरांना माझ्या कार्यालयात बोलावले. दोन तास त्यांच्याशी चर्चा केली. 
भाजपचे जे संस्कार आहेत, भाजप म्हणजेच मुंडे साहेब आहेत, हे माझ्या मनातून कधीच पुसरले जाणार नाही. भाजप आणि मुंडे साहेबांचे जे संस्कार आहेत, त्या संस्कारांनीच मला सांगितले की शिरीषजी मी तुमचे नाव कोअर कमिटीत घेणार नाही, पण माझं दायित्व आहे की पक्ष जे नाव घेईल, त्याला विजयी करणे आणि त्यासाठी मी माझा प्राण पणाला लावून काम करेल. 
त्यामुळे आता कामाला लागला, असेही स्पष्ट करताना पंकजा मुंडे यांनी बोराळकरांना उमेदवारी मिळाल्याने नाराज असल्याचेच अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.

Post a comment

0 Comments