या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण असून महाविकास आघाडीलाही बंडखोरीला जावे लागत आहे सामोरे.

‘या’ निवडणुकीला बंडखोरीचे ग्रहण; पदवीधर निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप


बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने वेग घेतला असून मागील पंधरा वर्षांपासून पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून आमदारकी भोगणाऱ्या आ.सतीश चव्हाण यांच्याबद्दल पदवीधरांमध्ये नाराजी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
याला कारणही तसेच मागच्या वेळी निवडून आलेल्या चव्हाण यांच्या सत्कारात चव्हाण यांनी “मी निवडून येणारच होतो मात्र”असा पुनरुच्चार केल्याने मतदारांना गृहीत न धरण्याचे वक्‍तव्य चव्हाण यांनी केले असा आरोप चर्चेतून व्यक्त होत आहे.

 

ग्रामीण भागात पदवीधरांच्या प्रश्नासाठी चव्हाण यांनी कोणतेही काम केले नसल्याने पदवीधरांध्येही चव्हाण यांच्याबाबत नाराजी असल्याचे चित्र दिसून येतेय! या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागले असून महाविकास आघाडीला देखील बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्यासह सत्तेतील मित्रपक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असल्याचे म्हटले जात असले तरीही शिवसेनेकडून बंडखोरी करण्यात आली आहे. 
हिंगोलीचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेच्या चिन्हावर जि.प.सदस्य असणारे दिलीप घुगे यांनी बंडखोरी करत आपले आव्हान उभे केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून मंत्रीपदावर असणारे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून सचिन ढवळे हे निवडणूक लढवत आहेत.ढवळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतःबच्चू कडू हे औरंगाबाद येथे आले होते. 
तर या निवडणुकीत असणाऱ्या ३५ उमेदवारापैकी चार उमेदवारांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे दिसून येते. यामुळे सतीश चव्हाण यांना देखील बंडखोरीचा सामना करावा लागत असल्याचे एकंदरीत दिसून येते. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने शिरीष बोराळकर यांना संधी दिली आहे. 
मागील दोन वेळेला पराभव सहन करावा लागलेल्या बोराळकर यांच्याकडून विजयाची गणिते ठरवताना कामाचे मूल्यांकन होणार आहे, हेही तेवढेच खरे आहे. पुन्हा बंडखोरीचा सामना बोराळकर यांना करावा लागत असून सर्वाधिक पदवीधर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील भाजपचे बंडखोर रमेश पोकळे हे निवडणुकीत उभे आहेत तर माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांनी पदवीधराचे प्रतिनिधी म्हणून दोन टर्म आमदारकी भोगली आहे.उमेदवारीच्या निमित्ताने त्यांनी त्यांची खदखद व्यक्त करत बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी योगदान दिले आहे. 
एकंदरीत एवढ्या मोठ्या पदावर राहूनही उमेदवारीसाठी बाहेर पडणे ही बाब न पटण्यासारखीच आहे. मात्र बीड जिल्ह्यातील भाजपच्या मोठया नेत्यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध छुपी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. 
तर या निवडणुकीत असणाऱ्या ३५ उमेदवारात वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना,एमआयएम,आम आदमी पक्ष आदी पक्षाचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. 
या सर्व घडामोडीवर विजयाचे गणित आणि द्वितीय क्रमांकाची मते घेणाऱ्यावर विजयाची गणित अवलंबून राहणार आहेत.

Post a comment

0 Comments