चिंतेची बाब : आजही सातत्याने निघाताहेत पॉझिटिव्ह रूग्ण.
औरंगाबाद : - शहरात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाने शिरकाव केल्यानंतर काही प्रमुख वसाहतींत सातत्याने कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. शहरातील सर्वच भागांत कोरोना रूग्ण आढळत असले तरी यापैकी प्रमुख 13 वसाहती या कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरल्या आहे. आजही या वसाहतींत कोरोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य दुसर्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला या भागांत अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाने शिरकाव केल्यापासून आजवर कोरोना संसर्गाची साखळी कायम आहे. मध्यंतरी कोरोना रूग्णांची रोजची वाढती संख्या ही दोन आकड्यांवर आली होती. रोजची वाढणारी संख्या सुरूवातीला 300 ते 400 रूग्णांच्या घरांत होती.
दरम्यान दिवाळीपूर्वी ही संख्या 50 ते 60 पर्यंत घटली होती. मात्र दिवाळीच्या दिवसांत खरेदीसाठी बाजारपेठांत झालेली गर्दी आता पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून तेथे थंडीमुळे दुसर्या लाटेने थैमान घातले आहे.
अद्याप महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली नसली तरी संभाव्य धोका लक्षात घेता राज्यभरातील जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीत खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी विविध उपाययोजरा राबविण्यावर भर दिला आहे. यातच आता नव्याने कोरोनाच्या हॉटस्पॉटची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना रूग्णवाढीचे प्रमाण अधिक असून यात प्रमुख 13 वसाहतींत सुरूवातीपासूनच सातत्याने कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. आजपर्यंत या वसाहतींत प्रत्येकी चारशेपेक्षा अधक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या वसाहतींतवर कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी पालिका प्रशासनाला अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या वसाहतींना अधिक धोका :- आजवर ज्या वसाहतींत कोरोना रूग्णांची संख्या अधिक आढळत आहेत, तेथे कोरोनाला रोखण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आले. यात सिडको एन-2, एन-6 : साईनगर, संभाजी कॉलनी व चिश्तिया कॉलनी, संजयनगर : रोहिदासनगर, मुकूंदवाडी, चिकलठाणा परिसर, बीडबायपास : देवळाई परिसर, सातारा, सदानंदनगर व भारतबटालियन, पदमपुरा : बन्सीलालनगर, कोकणवाडी, उस्मानपुरा : एकनाथनगर, श्रेयनगर, कांचनवाडी : विटखेडा, पैठण रोड, नक्षत्रवाडी, शिवशंकर कॉलनी : बालालीनगर, भानुदासनगर, जयभवानीनगर व हनुमाननगर, गारखेडा परिसर : हुसेन कॉलनी, जवाहर कॉलनी या वसाहतींचा समावेश आहे.
प्रमुख 13 वसाहतींत आजवर आढळलेले रूग्ण.
वसाहतींची संख्या एकूण रूग्ण मृत्यु बरे उपचार.
1) सिडको एन-2 परिसर 421 08 332 81
2) सिडको एन-6 परिसर 447 16 340 91
3) संजयनगर, मुकूंदवाडी 508 30 473 05
4) चिकलठाणा परिसर 409 20 278 111
5) बीड बायपास, देवळाई परिसर 464 12 272 180
6) पदमपुरा, कोकणवाडी परिसर 415 11 304 100
7) उस्मानपुरा-एकनाथनगर परिसर 437 18 273 146
8) कांचनवाडी, विटखेडा, नक्षत्रवाडी 623 06 357 260
9) शिवशंकर कॉलनी, भानुदासनगर 401 13 361 27
10) जयभवानीनगर, हनुमाननगर 458 15 429 14
11) जाधववाडी, जटवाडा, हर्सूल 936 49 744 143
12) गारखेडा, हुसेन व जवाहर कॉलनी 781 33 607 141
13) सातारा परिसर, भारत बटालियन 726 10 456 260
0 Comments