स्मार्ट सिटीला नवीन प्रकल्पासाठी निधीची गरज.आयुक्त उवाच : मनपासमोर 250 कोटी रूपये उभे करण्याचे आव्हान.

स्मार्ट सिटीला नवीन प्रकल्पासाठी निधीची गरज.

आयुक्त उवाच : मनपासमोर 250 कोटी रूपये उभे करण्याचे आव्हान.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल 750 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. एवढ्या निधीची कामे पालिकेने आधीच हाती घेतली आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीतून एखादा नवीन प्रकल्प हाती घेताना पालिकेसमोर निधीची अडचण निर्माण होणार आहे. 
नियमानुसार स्मार्ट सिटीत पालिकेला स्वहिस्सा म्हणून 250 कोटी रूपये द्यावे लागणार आहे. मात्र हा निधी कसा उभा करायचा, असा प्रश्न आता आहे. निधी उभा करता आला तरच नवीन प्रकल्प हाती घेता येईल, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे.
आजवर मार्ट सिटीअंतर्गत शहरात दोन वर्षांपूर्वी सिटी बस सेवा सुरू करण्यात आली. 

शहर सुरक्षेसाठी तब्बल दोनशे कोटींचा मास्टर सिस्टिम इंटिग्रेटेड(एमएसआय) प्रकल्प राबविला. सफारी पार्कसाठी देखील स्मार्ट सिटीतून 145 कोटींच्या निधीची तरतूद केली. याशिवाय ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन, सोलार पॅनल प्रोजेक्ट अशी कामेही करण्यात आली. मात्र, आता स्मार्ट सिटीतून आणखी नवीन कामे होणे कठीण आहे. 

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनीच असे म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी दि.4 प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, केंद्र सरकारकडे 1730 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा डीपीआर सरकारकडे सादर केला होता. यात ग्रीनफिल्डसाठी सातशे कोटींचा निधी स्थानिक पातळीवर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उभा करण्याचे ठरले होते. मात्र पुढे ग्रीनफिल्ड रद्द करावे लागले.

एक हजार कोटींची होणार कामे : 
स्मार्ट सिटीअंतर्गत शासनाकडून एक हजार कोटींचेच अनुदान देय आहे. त्यातही अडीचशे कोटींचा हिस्सा पालिकेला स्वतः टाकावा लागणार आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडून शहराला 750 कोटींचांच निधी मिळणार आहे. 

एवढ्या रकमेच्या खर्चाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीचा निधी आता संपला आहे. आगामी काळात पालिकेला हिश्याची रक्कम उभी करावी लागणार आहे. ती जमा केली तरच नवीन एखादा मोठा प्रकल्प हाती घेता येईल, असेही पांडेय यांनी स्पष्ट केले.

सफारी पार्कचा खर्च 250 कोटींवर : 
मिटमिटा येथे उभारल्या जाणार्‍या सफारी पार्कसाठी स्मार्ट सिटीतून 145 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आता या सफारी पार्कच्या खर्चात वाढ झाली आहे. कारण, यात लॉयन सफारी आणि टायगर सफारी करण्याचेही नियोजन आहे. 

भविष्यात निधीअभावी हा प्रकल्प अर्धवट राहू नये, यासाठी स्मार्ट सिटीतून आणखी 100 कोटींचा निधी घेतला जाणार आहे. त्यामुळे आता सफारी पार्कचा खर्च 250 कोटींवर जाणार असल्याचे आयुक्त पांडेय यांनी माहिती देताना सांगितले.

Post a comment

0 Comments