आयुक्‍तांची माहिती : शासनाची 50 कोटींच्या कामांना मंजूरी.

लवकरच सुरू करणार रस्त्यांची कामे.

आयुक्‍तांची माहिती : शासनाची 50 कोटींच्या कामांना मंजूरी.

औरंगाबाद - राज्य सरकारने मंजूर केलेल्या 152 कोटींच्या रस्तेकामांपैकी 50 कोटींच्या निधीतील रस्त्यांची कामे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कामांसाठीच्या निधीला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत पालिकेला मंजुरीचे आदेश प्राप्‍त होणार आहेत. त्यामुळे आता पालिका देखील रस्त्यांची कामे लगेच सुरु करणार आहे. संबंधित कंत्राटदारांना वर्कऑर्डर देण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत.
राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी 152 कोटींचा निधी मंजूर केला. या 152 कोटी रुपयांमधून पालिका, एमएसआरडीसी आणि एमआयडीसी या तीन प्रशासकीय संस्थांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे विभागून देण्यात आली. या निर्णयानंतर प्रत्यक्ष निधी उपलब्ध करुन देण्यास कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अडचणी निर्माण झाल्या. मात्र आता राज्य सरकारने सर्व विकासकामांना निधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका घेतली आहे. 

आमदारांना देखील विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे औरंगाबादची प्रलंबित विकास कामे मार्गी लागतील, अशी आशा निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवरच पालिकेचे आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांना शुक्रवारी दि.4 पालकमंत्री सुभाष देसाई यांचा फोन आला. पालकमंत्र्यांचा फोन आला तेव्हा काही पत्रकार आयुक्‍तांच्या दालनातच उपस्थित होते. पालकमंत्री आणि आयुक्‍तांचे फोनवर बोलणे झाल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. तेव्हा आयुक्‍तांनी सांगितले की, रस्त्यांच्या कामासाठी पालिकेच्या वाट्याच्या पन्नास कोटींना मंजूरी मिळाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. 

शासनाच्या मंजूरीचे पत्र देखील लगेचच पालिकेला प्राप्‍त होणार आहे. पालिकेच्या माध्यमातून करावयाची कामे आता मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांचा सतत पाठपुरावा.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सातत्याने पाठपुरावा करुन औरंगाबाद शहरासाठीची अनेक कामे मार्गी लावली, असा उल्लेख आयुक्‍तांनी केला. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे देखील आयुक्‍तांच्या दालनात उपस्थित होते. 

रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. आता संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर देऊन लगेच काम सुरु करा, असे आयुक्‍तांनी पानझडे यांना सूचित केले.

मनपा करणार 9 रस्त्यांची कामे.

- वोक्खार्ड ते जयभवानी चौक, नारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे, व रेल्वे स्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह येथील रोडचे पुर्नडांबरीकरण करणे.

- दिपाली हॉटेल ते जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे कॉक्रीटिंग करणे व रेल्वे स्टेशन फ्लायओवर येथील रोडचे पुर्नडांबरीकरण करणे.

- पुंडलीकनगर टाकी ते एन-3, एन-4 मधील हायकोर्ट ते कामगार चौक मुख्य रस्त्यापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटींग करणे.

-भवानी पेट्रोलपंप एन-2, ते सी-सेक्टर मुख्य रस्ता ठाकरेनगर एन-2, सिडको रस्त्याचे कॉक्रीटिंग करणे.

- महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी रस्त्याचे कॉक्रीटींग करणे.

- अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साईज ऑफीस रस्त्याचे डांबरीकरण करणे.

- जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल रस्त्याचे कॉक्रीटींग करणे.

- जळगाव रोड ते अंजता अंबेसेडर रस्त्याचे डांबरीकरण करणे.

- अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण करणे.

Post a comment

0 Comments