विभागात रब्बी हंगामाची 81 टक्के पेरणी पूर्ण. अद्यापही 18 टक्के पेरणी बाकी; कडधान्यांवर शेतकर्‍यांचा भर.

विभागात रब्बी हंगामाची 81 टक्के पेरणी पूर्ण.
अद्यापही 18 टक्के पेरणी बाकी; कडधान्यांवर शेतकर्‍यांचा भर.

औरंगाबाद - विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यात रब्बीची 81.57 टक्क्यांवर पेरणी झाली आहे. अद्यापही जवळपास 18 टक्क्यांवर पेरणी बाकी आहे. यंदा विभागात सर्वाधिक म्हणजे 108.77 टक्के पेरा हा कडधान्यांचा झालेला आहे. विभागात 3 डिसेंबर पर्यंतच्या अहवालानुसार सरासरी 1 लाख 69 हजार 666 पैकी 1 लाख 84 हजार 553 हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आहे.
विभागात सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे. बीडमधील शेतकर्‍यांनी तब्बल 135.93 टक्के हरभर्‍यासह अन्य कडधान्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात कडधान्याचे सरासरी 81 हजार 154 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार 311 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाला आहे. जालना जिल्हयात कडधान्याचे सरासरी 42 हजार 568 हेक्टर असूून, पैकी 48 हजार 607 हेक्टरवर म्हणजे 114.19 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 45 हजार 944 हेक्टर क्षेत्रापैकी 25 हजार 635 हेक्टरवर हरभरा आदी कडधान्याची पेरणी झाली आहे. टक्केवारीत 55.80 एवढे हे क्षेत्र आहे. विभागात गव्हाच्या 94 हजार 324.20 हेक्टरपैकी 90 हजार 311 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची 95.75 तर ज्वारीची 65.42 टक्के हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागात ज्वारीचे सरासरी 3 लाख 65 हजार 997.84 हेक्टरपैकी 2 लाख 39 हजार 449 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याची 97.53 हेक्टरवर पेरणी झालेली असून इतर तृणधान्यांचा पेरा 32 टक्क्यांवर आहे. करडई, जवस, सूर्यफूल व मोहरीसह इतर गळीतधान्याच्या पेर्‍याची टक्केवारी 14.08 एवढी आहे. रब्बीची एकूण 6 लाख 64 हजार 36 एवढ्या सरासरी हेक्टर क्षेत्रापेकी 5 लाख 41 हजार 682 म्हणजे 81.57 टक्के रब्बीचा पेरा झालेला आहे.

गहू पेरणी थंडीवर अवलंबून
यंदा अद्यापही म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. गव्हाच्या पेरणीसाठी थंडी आवश्यक असते. साधारपणे बाटलीतील खोबरेल तेल गोरठते, अशा कडाक्याच्या थंडीत गहू पेरणी उपयुक्त मानतात. त्यामुळे ओंब्यांमध्ये चांगले दाणे भरतात आणि गव्हाची उत्पादकताही चांगली मिळते. 

अद्यापही शेतकरी चांगल्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपासून रात्री आणि पहाटे थंडी सुरू झाली आहे. आता शेतकरी राहिलेली गहू पेरणी पूर्ण करतील.
प्रा. डॉ. किशोर झाडे, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद.

Post a comment

0 Comments