राज्य सरकार वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी काही करेल असे वाटत नाही, असं म्हणत आमदार प्रकाश आवाडेंनी आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी : वस्त्रोद्योगासह लघु उद्योगाचे प्रलंबित प्रश्न ठाकरे सरकारने १५ जानेवारीपर्यंत मार्गी लावावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशारा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला. प्रकाश आवाडे यांनी आज इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनमध्ये शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवली होती. वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या आणि निर्माण होत असलेल्या अडचणींसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासह मंजूर योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित होती. दोनच दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांनी कोल्हापुरात आवाडे कुटुंबाची भेट घेतली होती. 
आपण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी पत्राद्वारे वा प्रत्यक्ष भेटून वस्त्रोद्योगाच्या समस्या सांगितल्या आहेत. त्यावर बैठक घेण्याचे केवळ आश्वासन दिले जाते, मात्र बैठक घेतली जात नसल्याने आता राज्य सरकार हा उद्योग वाचवण्यासाठी काही करेल असे वाटत नाही” असं आवाडे यावेळी म्हणाले.

Post a comment

0 Comments