जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाला राष्ट्रवादी, शिवसेनेचा कडाडून विरोध; खासदार श्रीरंग बारणेंचा आंदोलनाचा इशारा

उरण: जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणास राष्ट्रवादी आणि शिवेसनेने कडाडून विरोध केला आहे. जेएनपीटी बंदर शेतकऱ्यांच्या त्यागातून आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. आपल्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या जैसे थे ठेऊन जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे. जेएनपीटी बंदरातील कर्मचाऱ्यांना संकटात टाकणाऱ्या या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून जेएनपीटीचं खासगीकरण केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दिला.
केंद्र सरकारने जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णया विरोधात आज जेएनपीटी कामगारांनी जेएनपीटी प्रशासन भवनावर प्रचंड मोर्चा काढला होता. ‘पीपीपी हटवा, जेएनपीटी कंटेनर टर्मिनल वाचवा’, अशा घोषणा देत कामगारांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कामगारांचा हा विशाल मोर्चा पोलिसांनी कासव चौकातच अडवला. त्यामुळे या ठिकाणीच मोर्चाचं सभेत रुपांतर करण्यात आलं. जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना आणि जेएनपीटी वर्कर्स युनियन या संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आवर्जून उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी हा इशारा दिला.

Post a comment

0 Comments