महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड, सोशल मीडियातून त्रास दिल्यास शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी - अनिल देशमुख

मुंबई: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिलांना आणि मुलींना सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. महिला व मुलींवरील अत्याचारांना वेसन घालण्यासाठीच्या शक्ती विधेयकावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. शक्ती विधेयकाचा प्रस्ताव आता राज्याच्या अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांची खैर नाही
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या विधेयकात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती. आता मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरून महिलांना किंवा मुलींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. 

Post a comment

0 Comments