नाक कापले!

नाक कापले!

मुंबई :- पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांचे निकाल लागले आहेत. यामध्ये अनपेक्षितपणे महाविकास आघाडीने बाजी मारली असून भाजपचे नाक कापले गेले आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात भाजप नेत्यांना कापलेल्या नाकाचे भोक दाखवित फिरावे लागणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला फटका बसला. 
महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सरशी झाल्याने फुशारकी मारणारांचे नाक कापले गेले. या निवडणुकीच्या प्रचार निमित्ताने मागील महिनाभरापासून राज्याच्या राजकीय रणांगणावर आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा धडाडत होत्या. मात्र, 29 नोव्हेंबरच्या संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि मंगळवार, 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर म्हणजे, गुरुवारी, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरु झाली आणि मग धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल पहिल्यांदा समोर आला. यामध्ये अमरीशभाई पटेल यांनी बाजी मारली. अमरीशभाई माजी शालेय शिक्षणमंत्री. ते मूळचे काँग्रेसचेच; पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या मोक्यावर त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ झटकून भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. अर्थातच त्यांना काँग्रेस सदस्यत्त्व आणि विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. 

अमरीशभाई भाजपमध्ये गेले तरी त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील समर्थक सदस्य व इतर पक्षीय सदस्यांशी चांगला संपर्क राहिला. म्हणूनच आता झालेल्या पोटनिवडणुकीत अमरीशभाई पटेल यांना विजयाचा गुलाल उधळता आला. हे यश त्यांचे स्वतःचे आहे. याचे श्रेय भाजपला फारसे घेता येणार नाही; पण अमरीशभाईंच्या विजयाने भाजपनेते नेहमीसारखेच हुरळून गेले. 

धुळे-नंदुरबार पदवीधर मतदारसंघात 50 टक्के मतेही रोखता आली नाहीत. यावरून महाविकास आघाडी सरकारचे उद्याचे भवितव्य काय राहील, हेच स्पष्ट होत असल्याची खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर दिली. खरे तर, महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य भाजप नेते रोजच वर्तवित असतात. या सरकारचा लवकरच बोर्‍या वाजेल, असे त्यांच्याकडून सांगितले जात असते. 

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी सरकारला आपला गाशा गुंडाळावा लागेल, असेही काही भाजप नेते सांगत होते; पण प्रत्यक्षात या निवडणुकीत भाजपवरच आपला गाशा गुंडाळण्याची वेळ आली. नवलाईची बाब अशी की, नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. 

पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख 22 हजार 145 अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले. भाजपच्या संग्राम देशमुख यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. नेहमी भाजपच्या पाठीशी राहणार्‍या पुणेकर मतदारांनी यंदा आघाडीच्या पारड्यात मते टाकून भाजपच्या गडाला खिंडार पाडले. 

पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर हे परिवर्तन घडले. नागपूरमध्येही असाच अनुभव आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ; पण तिथेही त्यांना फटकाच बसला. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपची पिछेहाट झाली.महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली. नागपूर मतदारसंघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला. 

भाजपचे संदीप जोशी हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. खरे तर, नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होती; पण अनिल सोले यांचे तिकीट कापून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पारडे जड झाल्याचे बोलले गेले; पण देवेंद्र फडणवीस यांना आपला उमेदवार निवडून आणण्यात यश आले नाही. या निवडणुकीमध्ये औरंगाबादचीही एक महत्त्वाची लढत होती. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. 

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली आहेत. तर, भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावे लागले.शिरीष बोराळकर हे माजी मंत्री पंकजा मुडे यांचे समर्थक मानले जातात. 

पंकजा मुंडे मागील काही दिवसांत नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न झाल्याचे बोलले गेले; पण शिरीष बोराळकर यांचाही बोर्‍याच वाजला! एकूणच भाजपची दाणादाण उडाली. पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहाही जागांवर विजयाचा दावा सांगणारे भाजप नेते तोंडावर पडले. तरीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःला सावरत शिवसेनेला डिवचले.
‘शिवसेनेने अमरावतीची जागा गमावली. यात फायदा ‘राष्ट्रवादी’चा झाला. पुणे, मराठवाडा पदवीधरची जागा ‘राष्ट्रवादी’ने जिंकली. 

अमरावती शिक्षक मतदारसंघ अप्रत्यक्षरित्या ‘राष्ट्रवादी’कडे राहणार आहे. कारण, तिथे पहिल्या क्रमांकावर असलेले उमेदवार अनिल देशमुख यांचे मेहुणे आहेत. ते ‘राष्ट्रवादी’तच जातील. काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. यात शिवसेनेला काय मिळालं?,’ असा सवाल करून चंद्रकांत पाटील, शिवसेनेने या निकालांतून बोध घ्यायला हवा, असा सल्ला देतात. केवळ जुन्या प्रेमातून सांगतोय,’ असेही सांगण्यास ते विसरत नाहीत. एकूण काय, तर स्वतःचे हसू झालेले चंद्रकांत पाटील हे आपल्या हातरुमालाने शिवसेनचे नाक पुसू पाहात आहेत. त्यामुळे काय होईल? शिवसेना पुन्हा मैत्रीचा हात देईल? तशी चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा असली तरीही ते आता शक्य नाही. म्हणूनच भाजपला यापुढे कापलेल्या नाकाचे भोक दाखवित फिरावे लागेल. कर्माचे भोग भोगावे लागतात, ते असे.

Post a comment

0 Comments